Koyna Water Mumbai: ‘कोयनेचे पाणी मुंबईला…’, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर मंत्री शिवेंद्रराजे महत्त्वाचं बोलले; कुणाला सुनावलं?
"कोयना धरणामध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर कोकणातून पुढे जाणारे बरेचसे पाणी वाया जाऊन समुद्राला मिळते; हे पाणी समुद्रात वाया जाण्यापेक्षा मुंबईकडे वळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे नियोजन अत्यंत योग्य असून त्यात काहीही चुकीचे नाही, असं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

संतोष नलावडे, सातारा: साताऱ्यातील कोयना धरण आता मुंबईकरांची तहान भागवणार आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून समुद्रात जाणारे पाणी मुंबईला वळवण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयाला पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा जोरदार विरोध होत आहे. अशातच राज्याचे बांधकाम मंत्री तथा भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय म्हणालेत शिवेंद्रराजे भोसले?
“कोयना धरणामध्ये वीजनिर्मिती झाल्यानंतर कोकणातून पुढे जाणारे बरेचसे पाणी वाया जाऊन समुद्राला मिळते; हे पाणी समुद्रात वाया जाण्यापेक्षा मुंबईकडे वळवण्याचे मुख्यमंत्र्यांचे नियोजन अत्यंत योग्य असून त्यात काहीही चुकीचे नाही. कोयनेचे वीजनिर्मितीचे पाणी मुंबईला वळवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय अत्यंत धाडसी आणि योग्य असल्याचे,” मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणालेत.
“मुंबई ही राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असून तिची लोकसंख्या व पाण्याची गरज सातत्याने वाढत आहे. भविष्याचा विचार करून घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा असून हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच माण-खटाव भागाला पाणी मिळाले नसल्याच्या टीकेवर बोलताना, आज उरमोडी प्रकल्पाचे पाणी माण-खटावमध्ये पोहोचल्याने तेथील शेतकरी बागायतदार झाला असून अजिंक्यतारा कारखान्याला त्या भागातून ऊस येत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
शशिकांत शिंदेंवर निशाणा!
दरम्यान, “कोयनेच्या धर्तीवर सोळशी धरणाचा निर्णय घेण्याचे आवाहन करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना प्रत्युत्तर देताना, “तुमच्याकडे सत्ता, कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना सोळशी आणि जावळी तालुक्यातील बोंडारवाडी धरण का मार्गी लागले नाही?” असा सवाल शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केला. तसेच सातारा जिल्ह्यातील सोळशी आणि बोंडारवाडी यांसारख्या सिंचन प्रकल्पांबाबत महायुती सरकार पूर्णपणे सकारात्मक असून, स्थानिक विरोध मावळून हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
