शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर, शिंदे गटातील मोठा नेता नाराज, श्रीकांत शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना
नाशिकमधील शिवसेनेत अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. माजी खासदार हेमंत गोढसे यांनी पक्षातल्या शिस्ती अभावावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पक्ष नेतृत्वावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी स्थानिक पातळीवरील गटबाजी आणि पक्षशिस्तीच्या अभावावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गोढसे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने राजकारणात आणखी कुतूहल निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाराजीनाट्य सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता नाशिकमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार हेमंत गोडसे हे पक्षातील घडामोडींवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेषतः लोकसभा निवडणुकीपासून गोडसे अस्वस्थ असून, त्यांना उमेदवारी मिळण्यास झालेल्या विलंबामुळेच पराभव झाल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेमंत गोडसे यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाराजीवर स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी त्यांनी आपण पक्ष नेतृत्वावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यासाठी चांगले काम केले. मात्र, पक्षात शिस्त राहावी, यासाठी आपण अनेकदा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. “पळसाला प्रत्येक ठिकाणी तीन पाने असतात,” असे म्हणत त्यांनी स्थानिक पातळीवरील गटबाजीला दुजोरा दिला. पक्षात शिस्त असेल तर प्रत्येकाला न्याय मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मी नाराज नाही
“मी पक्ष नेतृत्वावर नाराज नाही, मात्र स्थानिक पातळीवर पक्ष शिस्त नाही. याबाबत मी अनेक वेळा तक्रार केली आहे. मला विश्वास आहे की माझ्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली जाईल.” असे हेमंत गोडसे म्हणाले. जिल्ह्यातील मंत्र्यांनी पक्ष संघटनेत लक्ष घातल्यास अशा अडचणी येणार नाहीत. छोटे प्रश्नही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्यास त्यांच्या कामाचा ताण वाढेल. पक्ष शिस्त आणि नियोजन असल्यास आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होईल, असेही हेमंत गोडसे यांनी नमूद केले.
शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस
आज आपण खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भेटण्यासाठी मुंबईला जात असल्याचे हेमंत गोडसे यांनी सांगितले. ही भेट सामाजिक कामासाठी आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र आता या भेटीकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. सध्या राजकीय वर्तुळात याबद्दलच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान सध्या तरी आपण शिवसेनेतच असून, अन्यत्र जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे हेमंत गोडसे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांची नाराजी आणि त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे पाहता नाशिकमधील शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस आगामी काळात काय वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
