Sanjay Raut : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही – संजय राऊतांचा रोख कोणाकडे ?

त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तर त्या साागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये , की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल.

Sanjay Raut :  तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही - संजय राऊतांचा रोख कोणाकडे ?
संजय राऊत
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 29, 2025 | 11:25 AM

भारतीय जनता पक्षसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे. पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही, अशा शब्दांत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या पिढीला संजय राऊत यांनी खणखणीत टोला लगावला आहे. आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी नेहमीप्रमाणे अनेक विषयांवर बोलत चौफेर फटकेबाजी केली. तेव्हाच त्यांनी हे वक्तव्य करत पवारांच्या पक्षातील नव्या पिढीला उद्देशून हा चिमटा काढला.

शरद पवारांची जी नवी पिढी आहे, ती भाजपसोबत जाण्यासाठी व्याकूळ आहे, त्यामुळे कदाचित अजित पवाराचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजपासोबत घेणं होऊ शकतं. शिवसेनेची नवी पिढी,शिंदे वगैरे भाजपसोबत गेले, तसाच निर्णय शरद पवारांची नवी पिढी देखील घेऊ शकते का असा सवाल राऊत यांना विचारण्या आला होता. शरद पवार नव्हे पण त्यांची नवी पिढी हे पाऊल उचलू शकतात का, असंही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर राऊतांनी वर नमूद केलेलं उत्तर देत खोचक टोला हाणला.

तहान लागली तरी..

सुप्रिया सुळे याचं किंवा अन्य काही नेत्यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात.त्यांना तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तर त्या साागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये , की प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत, तेच धडपडतायच तिथे अस्तित्वासाठी, नवी जाऊन काय करणार असा थेट सवालही राऊतांनी विचारला.

हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय

राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट आणि त्या गटाचं नेतृत्व करणारे मोठे नेते भाजपसोब जाण्यास व्याकूळ आहेत पण शरद पवारांनी अजून काहीच निर्णय घेतलेला नाही, त्यांनी नव्या पिढीवर निर्णय सोपवला आहे अशी चर्चा सुरू असल्याचे विधान राऊतांसमोर एकाने केले. त्यावर राऊतांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण मला जे ज्ञान आहे, त्यानुसार शरद पवार हे भाजपसोबत जाणार नाहीत. शरद पवार साहेबांनी राजकारणामध्ये खूप मोठी इनिंग खेळली आहे, अजूनही ते खेळत आहेत. आता ते प्रत्यक्ष मैदानावर नसले तरी ते कोचिंगच्या भूमिकेत आहेत. मी त्यांना ओळखतो, त्यांची विचारधारा आणि भूमिका मला माहीत आहे. ते आता 85 वर्षांचे आहेत,  पण अशा नेत्यांना काम करताना वयाचे बंधन नसतं. त्यामुळे आत्तापर्यंत शरद पवार यांची जी भूमिका, विचारधारा होती ते पाहिल्यानंतर ते भारतीय जनता पक्षासोबत किंवा अशा विचारांच्या लोकांसोबत ते कधीच जाणार नाहीत, असा मला ठाव विश्वास आहे, असं राऊत म्हणाले.

राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालं आहे

आता आमच्या कडल्या, आम्हीच घडवलेल्या काही पिढ्या तिकडे गेल्या, त्याला तुम्ही काय करणार? मा. बाळासाहेब ठाकरेनी ज्यांना घडवलं किंवा उद्धव ठाकरेंनी ज्यांना उभं केलं ते (भाजपासोबत) पळून गेले. ते कोणाच्या हातात नाही ना.  छगन भुजबळ असोत, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे असतील, गणेश नाईक हे मूळचे शिवसेनेचे लोकं आहेत. काही नगरसेवत, आमदार,खासदारही असतील, ते गेले ना. सध्याच्या राजकारणामध्य़ कोणी कोणाच्या हातात हात नाही, राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे, लोकांना तत्कालिक फायदे हवेत, त्यासाठी लोकं जातात अशी टीकाही राऊतांनी केली.

लोकांना प्रॉपर्टी वाचवायची असते, सरकारचा दबाव असतो, त्यामुळे भयभीत होऊन लोकं जातात. शरद पवारांना जे सोडून गेले ते काही फार आनंदी, चांगल्या मनाने गेले असतील असं वाटत नाही असंही राऊत म्हणाले.