राज ठाकरे देशाचे नेते, तुम्हाला अपेक्षित असलेलं ते नक्की बोलतील; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण राज आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीमुळे तापले आहे. संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेबाबत भाष्य करताना युतीची शक्यता वर्तवली. त्यांनी महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला.

महाराष्ट्रात सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून यावरुन वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दादरच्या शिवतीर्थावर एका तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे महत्त्वाच्या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याबद्दल काही भाष्य करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आता नुकतंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेबद्दल भाष्य केले आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊतांनी राज ठाकरे तुम्हाला जे अपेक्षित आहे, त्यावर नक्कीच बोलतील, असे म्हटले. राज ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. महाराष्ट्रातील अनेक गोष्टींवर त्यांनी अलीकडेच भाष्य केले आहे. इंद्रायणी नदीवर जो पूल कोसळला त्यावर ते बोललेत. राज ठाकरे हे या देशाचे नेते आहेत. एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे ते काय बोलतात आणि बोलणार आहेत यावर मी बोलणं योग्य नाही. ते काय बोलणार हे आम्हीही नक्की ऐकू, असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय होतील
“तुम्हाला जे अपेक्षित आहे, त्यावर ते नक्कीच बोलतील अशी मला अपेक्षा आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून चांगल्या भूमिकेतून चर्चा करत आहोत. मला खात्री आहे महाराष्ट्राच्या कल्याणाचे निर्णय होतील”, असे संजय राऊतांनी म्हटले.
“उद्या मूळ शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन आहे. डुप्लिकेट शिवसेनेचा नाही. यावेळी उद्धव ठाकरेही अनेक विषयांवरील आपल्या भूमिका स्पष्ट करतील. ज्याबद्दल लोकांच्या मनात काही शंका आहेत, संभ्रम आहे, उत्सुकता आहे, असे अनेक विषय आहेत, ज्याबद्दल उद्धव ठाकरे नक्कीच बोलतील”, असेही संजय राऊतांनी म्हटले.
भाजपने सलीम कुत्ताला संत म्हणून पदवी दिलीय
“मुख्यमंत्र्यांची चाल तिरकी असते. त्यांना सलीम कुत्ता चालतो, उद्या दाऊद चालेल. मी वारंवार तेच सांगत होतो, शरद पवार अशा लोकांना सोबत घेणार नाहीत. जे संधीसाधू तिकडे गेलेत, आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही. भारतीय जनता पक्षाने सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिलीय. भारतीय जनता पक्ष पलटूराम आहे. प्रफुल पटेल यांचे दाऊदच्या हस्तकासोबत संबंध आहेत हे नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं”, असेही संजय राऊत म्हणाले.
