शरद पवारांचं ‘ते’ ट्वीट संजय राऊतांकडूनही रिट्वीट

हा महाराष्ट्र कुणासमोरही झुकणार नाही, असं ट्वीट शरद पवारांनी केलं होतं, ज्याला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Sharad pawar) यांनीही रिट्वीट केलं.

शरद पवारांचं 'ते' ट्वीट संजय राऊतांकडूनही रिट्वीट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी पीएमएलए कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या या कारवाईनंतर शरद पवार (Sanjay Raut Sharad pawar) स्वतः ईडीला भेट देणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. हा महाराष्ट्र कुणासमोरही झुकणार नाही, असं ट्वीट शरद पवारांनी केलं होतं, ज्याला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut Sharad pawar) यांनीही रिट्वीट केलं.

“मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही,” असं ट्वीट शरद पवारांनी केलं होतं. संजय राऊतांनीही रिट्वीट करत या वक्तव्याला पाठिंबा दिला.

शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार

“ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. नक्की गुन्हा काय आहे, हे मला समजावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ईडीच्या अधिकाऱ्यांना जी काही माहिती हवी असेल ती देईन, शिवाय अन्य काही पाहुणचार त्यांना करायचा असेल तर त्यासाठीही माझी तयारी आहे,” असं शरद पवार म्हणाले होते. त्यानुसार ते शुक्रवारी दुपारी 2 वाजता ईडीच्या मुंबईतील कार्यालयात जाणार आहेत.

“ठरल्याप्रमाणे ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी जात आहे. या कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. ईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच तेथे शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी,” असं आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI