तुम्ही देशाचे गृहमंत्री, मग भीती कसली? निडरपणे वागा, संजय राऊतांनी अमित शाहांना डिवचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौऱ्यावर असताना, ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. यावर संजय राऊतांनी तीव्र टीका करत, "गृहमंत्र्यांना भय वाटण्याचे कारण काय?" असा सवाल केला.

तुम्ही देशाचे गृहमंत्री, मग भीती कसली? निडरपणे वागा, संजय राऊतांनी अमित शाहांना डिवचले
| Updated on: Oct 05, 2025 | 11:04 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शिर्डीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील सध्या शिर्डीत आहेत. आज सकाळी ११ वाजता साई दर्शनाने अमित शाहांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर लोणी (प्रवरानगर) येथे कारखान्याच्या नूतनीकरणासह पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमापूर्वी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट सवाल केला आहे, तुम्ही गृहमंत्री आहात. मग इतकं भय वाटण्याचे कारण काय,? असा सवाल उपस्थित केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

जर त्यांच्या तिघांमधील भांडण मिटवायचे असतील तर त्यांना बंद दाराआडच बैठक घ्यावी लागेल. त्यांची भांडण ही बंद दाराआडच मिटवावी लागेल. देशाचे गृहमंत्री, निधड्या छातीचे, कश्मीरमधून ३७० कलम हटवणारे, शिवसेनेशी मुंबईत दोन हात करु पाहणारे, शिवसेनेसारखा बलाढ्य पक्ष फोडून दाखवणारे, सोनम वांगचूकला अटक करणारे असे आपले गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात नगर जिल्ह्यावर आहेत. ते देशाचे गृहमंत्री आहेत. आपल्याकडे लोकांची सुरक्षा हा विषय आहे. तुम्ही येण्याआधी तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना अटक करता, त्यांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करु नये, काळे झेंडे दाखवू नये म्हणून अटक करता, असे संजय राऊत म्हणाले.

तुम्ही मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच कारवाई केलेली नाहीत ही देखील तुमची भीती आहे. शेतकरी येऊ देणार नाही, किंवा ते अंगावर येतील अशी भीती तुम्हाला आहे. त्यामुळे अशा भयग्रस्त राज्य कर्त्याला देशावर राज्य करण्याचा अधिकार आहे का,” असा सवालही संजय राऊतांनी केला.

ते फार काळ चालणार नाही

लोकशाहीने आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे. त्यांना लोकांचं आदोलन नको आहे. त्यांना लोकांची भीती वाटते. ते गुजरात मॉडेल चालवत आहे. तुम्ही सामान्य शिवसैनिकांना अटक करता. त्यांनी तशी काही घोषणा केली आहे का, ते आपपल्या जागेवर काम करत होते. त्यांना पोलीस येतात आणि घेऊन जातात. कुठे घेऊन चालले सांगत नाही. हा महाराष्ट्रात काय प्रकार सुरु आहे. तुम्ही गृहमंत्री असाल मग गृहमंत्र्यासारखे निडर, निर्भीडपणे वागा. लोकांना सामोरे जा. त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्या. हा पळपुटेपणा कशासाठी. फडणवीसही असेच वागतात. खोटे गुन्हे दाखल करण, अटक करणं यावरच राजकरण सुरु आहे. ते फार काळ चालणार नाही,” असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.