एकनाथ शिंदे दिल्लीत कशासाठी जातात? फडणवीसांवर कारवाईची… सामनातून मोठा गौप्यस्फोट
सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे तर कुणी कोणाची ‘जनाची-मनाची’ काढत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मिंध्यांना असे धक्के देत असतात की मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही. त्यामुळे मिंधे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही मिंधे यांनी याचसाठी दिल्लीवारी केली होती, अशा शब्दात अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
सामना अग्रलेखात काय?
राज्यात मिंधे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून जनतेचे काय भले झाले? होणार तरी कसे? सत्ता उपभोगणाऱ्या घटक पक्षांना आणि त्यांच्या कर्त्याधर्त्यांना तसे वाटायला तर हवे? वाटले तरी आपापसातील कुरघोड्या आणि कुरबुरींमधून वेळ तर मिळायला हवा? यांचा सगळा वेळ आणि शक्ती एकमेकांचे पत्ते कापण्यात, शह-काटशह करण्यात, परस्परांवर कुरघोड्या करण्यात, एकमेकांचे पाय खेचण्यात आणि नाराजीचा ‘राग’ आळवण्यातच जात आहे. या नाराजी नाटय़ामध्ये प्रमुख भूमिका करणारे उपमुख्यमंत्री मिंधे हे नेहमीप्रमाणे आघाडीवर आहेत. सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते स्वयंघोषित ‘ब्रँड अॅम्बेसेडर’च आहेत. त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागत असते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.
मिंध्यांकडे मलईदार खाती, त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात?
आताही त्यांना अशीच उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहिले. ते म्हणे थेट श्रीनगरला जाऊन बसले आहेत. श्रीनगरात ते कशासाठी गेले? एकतर त्यांनी कामाख्या मंदिरात अघोरी पूजेसाठी आसाम-गुवाहाटीला’ जायला हवे होते. नाहीतर त्यांचे नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील ‘दरे’ गावी जायला हवे होते, पण नाराज मिंधे गेले थेट श्रीनगरात. तेथे त्यांनी एका पडेल पहेलवानासोबत रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रसिद्धीसह पार पाडला. उपमुख्यमंत्री असलेल्या मिंध्यांकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातली मलईदार खाती आहेत. नगरविकास, गृहनिर्माण, रस्ते उपक्रम. त्यात हे महाशय कधी लक्ष घालतात? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही
इथे मलिदा-मलई गोळा करायची व दिल्ली, श्रीनगर, दरे गाठायचे हाच यांचा सार्वजनिक उपक्रम सध्या आहे. म्हणजे एकंदरीत असे की, मुख्यमंत्री फडणवीस हे मिंध्यांना असे धक्के देत असतात की मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही. त्यामुळे मिंधे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच. गेल्या आठवड्यातही मिंधे यांनी याचसाठी दिल्लीवारी केली होती. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांची भेट घेऊन नाराजीचा पाढा वगैरे वाचला होता. त्यांनी म्हणे पंतप्रधानांना ‘महादेवा’ची मूर्तीही एक प्रतीक म्हणून भेट दिली. मिंधे यांचे हे असे अधूनमधून ‘कैलास पर्वता’वर जाणे आणि तेथे आपल्या ‘नाराजीच्या जटा’ आपटणे हे काही जनतेला नवीन राहिलेले नाही. फडणवीस सरकारमध्ये ‘उप’ झाल्यापासूनच हे उपटण्याचे आणि आपटण्याचे उद्योग सुरू आहेत. फक्त मिंधेच नाहीत, तर सत्तापक्षांमधील इतरही मंत्री-नेते आणि पदाधिकारी यांचेही हेच सुरू आहे, असा गंभीर आरोप सामनातून करण्यात आला आहे.
अजित पवार आणि मिंधे गटाचे मंत्री यांच्यात ‘तू तू – मैं मैं’ सुरूच
मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला मिंधेंसह त्यांचे दुसरे मंत्री भरत गोगावले यांनीही दांडी मारली. मिंधे श्रीनगरला गेले, तर गोगावलेंनी दिल्ली गाठली. तेथे म्हणे त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेत राज्यातील भाजप नेतृत्वाविरोधात रडगाणे गायले. रायगडच्या पालकमंत्री पदाचे हाडूक जोपर्यंत घशातून निघत नाही, तोपर्यंत हे रडगाणे सुरू राहणार आहे. तिकडे भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उचकी लागली व दादांची ‘जनाची मनाची लाज’त्यांनी बाहेर काढली. आमदार निधी आणि खात्यांना दिला जाणारा निधी यावरूनही अर्थखाते सांभाळणारे अजित पवार व मिंधे गटाचे मंत्री यांच्यातील ‘तू तू – मैं मैं’ सुरूच असते, असाही दावा ठाकरे गटाने केला आहे.
सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी
मिंधे गटाच्या मंत्र्यांनी त्यांच्या फाइल्स आपल्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवाव्यात या मिंधे यांच्या आदेशाला मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात कात्रजचा घाट दाखवला होता. गेल्या आठवड्यात ‘बेस्ट’ उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावरूनही सामान्य प्रशासन विभाग आणि नगरविकास विभाग यांनी एकाच दिवशी स्वतंत्र आदेश काढले होते. त्यावरूनही फडणवीस-मिंधे यांच्यातील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आलाच होता. महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाहीत. कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे. त्यातून रोजच एकमेकांची उणीदुणी काढली जात आहेत. कुणी श्रीनगरला जाऊन बसत आहे तर कुणी कोणाची ‘जनाची-मनाची’ काढत आहे. सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या-कुरबुरी अशी ‘कु’ची बाराखडी सुरू आहे. हे सरकार जनतेचे आहे, असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे. सत्ताधारीही नाराज आणि जनतादेखील. सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी नाराजीच्या ‘छटा’ दाखवीत आहेत, तर कुणी नाराजीच्या ‘जटा’ आपटत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे.
