आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय, शिंदे गटाच्या नेत्याची तटकरेंवर सडकून टीका

शिंदे गटाच्या आमदाराने "छावा" चित्रपटाचा संदर्भ देऊन औरंगजेबाची उपमा देत नेत्यावर टीका केली आहे. गद्दारी आमच्या रक्तात नाही, पण तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही समोरून वार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय, शिंदे गटाच्या नेत्याची तटकरेंवर सडकून टीका
आमचा औरंगजेब सुतारवाडीत बसलाय, शिंदे गटाच्या नेत्याची कोणावर सडकून टीका ?
Image Credit source: social
| Updated on: Mar 06, 2025 | 9:59 AM

राज्यात सध्या औरंगजेबावरून वातावरण तापलेलं आहे. समाजवादी पक्षाचे नेते व मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गोडवे गायले होते. मुगल सम्राट औरंगजेब याचे त्यांनी कौतूक केले आहे. औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा दावा अबू आझमी यांनी केला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटली. अबू आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला तसेच संपूर्ण अधिवेशापर्यंत त्यांचे निलंबन करण्यात आले. हा वाद ताजा असतानाच आता शिंदे गटाच्या एका नेत्याने केलेल्या वक्तव्यामुळे नवा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत थोरवे यांनी सुनील तटकरे यांना औरंगजेबाची उपमा दिली. ‘आमचा औरंगजेब हा सुतार वाडीत बसलाय’, अशी सडकून टीका त्यांनी केली असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. आता त्यांच्या या टीकेला सुनील तटकरे काय प्रत्युत्तर देतात, याकडेही लोकांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार महेंद्र थोरवे यांनी नाव न घेता सुनील तटकरेंवर टीका केली. त्यांना मुघल सम्राट, क्रूरकर्मा औरंगजेबाची उपमा दिली. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. ‘ चुकीच्या पद्धतीने राजकारण कराल तर रायगड लोकसभा लढवण्याची आमची तयारी आहे’ असा थेट इशारा महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना दिला.

नेमकं काय झालं ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, असा टोला मंत्री भरत गोगावले यांना लगावला होता. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत धुसफूस सुरू आहे. रायगडचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं, मात्र शिवसेना शिंदे गटाचाही त्यावर दावा असून भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे. याच मुद्यावरून तिढा कायम असून सध्या रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे. याच मुद्यावरून सुनील तटकरेंनी गोगावले यांना कोपरखळी मारली होती.

मात्र त्यांच्या याच विधानाचा शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंनी समाचार घेतला आणि जशास तसं उत्तर दिलं. पंचांचा निर्णय अंतिम असतोआणि या सामन्यात तुम्ही कप्तान होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे (Cricekt) उदाहरणे आम्हाला देऊ नका. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना सुनावले.

औरंगजेबाशी केली तुलना

याचवेळी बोलतान थोरवे यांनी नाव न घेता, अप्रत्यक्षपणे तटकरेंवर सडकून टीका करत त्यांची तुलना औरंगजेबाशी केली. यावेळी त्यांनी ‘छावा’ चित्रपटाचे उदाहरण देत टीकास्त्र सोडलं. ‘ परिस्थिती आपण पाहिली. छावा चित्रपट पाहिला आपण, त्यात औरंगजेबाचं स्थान कुठे दाखवलं होतं, अकलूज.. महाराष्ट्रातील अकलूजमध्ये येऊन, डेरा बांधून, फितुरीने त्याने छत्रपती संभाजी महाराजांना तिथे कैद केलं होतं. आणि आजचं अकलूज कुठे आहे ? सुतारवाडीला… आजचा औरंगजेब कुठे आहे ? सुतारवाडीमध्ये बसला आहे’ असं म्हणत त्यांनी तटकरेंवर निशाणा साधला. ‘चुकीच्या पद्धतीने राजकारण आमच्याशी कराल, यापुढे लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला रायगडमध्ये येऊन तिथली लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे. गद्दारी आमच्या रक्तात नाही, पण तुम्ही पाठीत वार करण्याचा प्रयत्न कराल तर आम्ही समोरून वार करू ‘ असा इशारा थोरवे यांनी दिला.