
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा समावेश आहे. आता यावरुन सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब असली तरी, भाजपने याचा राजकीय उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे, तो जरूर साजरा करा. भाजपचा जन्म अशा उत्सवासाठीच आहे, पण हा जागतिक वारसा तुम्हाला पेलवेल ना? असा खोचक सवाल सामनातून करण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून आज महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला अशा एकूण 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरुन टीका करण्यात आली आहे. भाजपने १०० हून अधिक ठिकाणी शिवआरती आणि शक्तिप्रदर्शन करण्याचे जाहीर केले आहे, जेणेकरून शिवरायांचे स्वराज्य आणि त्यांची दुर्गसंपदा ही भाजपमुळेच निर्माण झाल्याचा आभास निर्माण होईल, असा घणाघात सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी किल्ले बांधले, ते त्यांचे सामर्थ्य होते. मात्र, अनेक वर्षांपासून त्यांच्या जतनाकडे केंद्र आणि राज्य सरकारांनी विशेष लक्ष दिले नाही, असा आरोपही यातून करण्यात आला आहे.
“आज महाराष्ट्रावर ९ लाख कोटींचे कर्ज असताना, ‘लुटारूंचे राज्य’ चालवणारे लोक शिवरायांच्या नावावर जल्लोष करत आहेत. तसेच, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने दिला, पण महाराष्ट्रातच मराठी भाषा आणि मराठी माणसाचा सन्मान राहिलेला नाही. शिवरायांची भाषा जतन केली जात नाही. त्यासाठी आजही संघर्षाच्या ठिणग्या उडत आहेत व आता किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळाल्यावर भाजपवाले टणाटणा उडय़ा मारू लागले. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवरायांची भवानी तलवार ब्रिटिश म्युझियममधून आणली व निवडणुकीपूर्वी या मंडळींनी त्या तलवारीची राजकीय यात्रा काढली. त्या तलवारीचे पुढे काय झाले? आता ती तलवार कोठे आहे? मुळात ही तलवार सरकार दावा करते त्याप्रमाणे भवानी तलवार नाही. राज्य सरकार शिवप्रेमींच्या भावनांशी खेळत आहे असे इतिहास तज्ञ सांगतात, तरीही भाजपवाल्यांनी तलवारीचेही राजकारण केलेच”, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
“इतिहासाची मालकी आपल्याकडेच आहे असे सांगण्याचा भाजपचा हा प्रयत्न गमतीशीर आहे. मात्र अंदर की बात अशी की, जागतिक वारसा लाभलेल्या या 12 किल्ल्यांचे संवर्धन सरकारने केले नाही तर युनेस्को जागतिक वारशाचे हे मानांकन काढून घेईल. तसा नियमच आहे. पश्चिम घाट हासुद्धा एक ऐतिहासिक वारसा आहे. मात्र आज त्या पश्चिम घाटावर अमानुषपणे हातोडे, बुलडोझर, जेसीबी चालवले जात आहेत. अलमट्टी धरणाची उंची वाढवणे असो की शक्तिपीठ महामार्गाची जबरदस्ती, या World Heritage वरच हातोडे चालतील व युनेस्कोने ज्याचे संवर्धन करण्याचा संदेश दिला तेच नष्ट केले जाईल, असा आरोपही अग्रलेखातून करण्यात आला आहे. त्यामुळे, भाजपला हा ‘जागतिक वारसा’ पेलवेल का”, असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.