रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं ? उद्धव ठाकरे संतापले

कबूतरांसाठी, कुत्र्यांसाठी आणि हत्तीणीसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरून लढा देतात. ही चांगली गोष्ट आहे, माणूसकी पाहिजेच.. पण पहलगामच्या हल्ल्यात लोकांचे जीव गेले तेव्हा ही माणूसकी कुठे गेली होती ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं ? उद्धव ठाकरे संतापले
उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
Image Credit source: social media
| Updated on: Aug 23, 2025 | 2:39 PM

कबूतरांसाठी लोक हजारोंच्या संख्येने  रस्त्यावर उतरतात, तेच कुत्र्यांसाठीही होतं आणि हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरून लढा देतात. ही चांगली गोष्ट आहेच,माणूसकी पाहिजे, भूतदया पाहिजे. पण मग पहलगाममध्ये जेव्हा आपल्याच देशाचे निष्पाप नागरिक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या माता-भगिनींचं कूंकू पुसलं गेलं, तेव्हा ही भूतदया,हीच माणूसकी कुठे गेली ? या घटनेला अजून 2-3 महीने झाले नाहीत,  आपले पंतप्रधान म्हणतात की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग त्या गरम सिंदूरचं आता कोल्ड्रिंक झालं का ? रक्त आणि क्रिकेट कसं चालतं ? असा सवाल विचारत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवला.

पाकिस्तासोबत तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी कशी देता ? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तानविरुद्ध आता क्रिकेटचा सामना खेळणार, मग तुमचा गरम सिंदूर कुठे गेला ? या भाकडकथा का ? तिकडे सैनिकांनी शौर्य गाजवलं आणि इथे राजकारणी श्रेय घेतात. दादरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

हे भाजपवाले गधडे..

तिथे सोफिया कुरेशी या महिला अधिकाऱ्यांनी अभिमान वाटावा असं काम केलं, पण त्या महिला अधिकारीलासुद्धा, हे भाजपवाले गधडे.. त्यांना (कुरेशी) आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली,तरीही ते डोक्यावर मंत्री म्हणून बसलेत. देशभक्तीचं थोतांड गाताना या लोकांना लाज वाटत नाही अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवला.

असं होतं तर मग शिष्टमंडळ परदेशात का पाठवलं ? एकेक खासदार घेतले आणि जगभर पाठवले, ऑपरेशन सिंदूर बद्दल, पाकिस्तानविरुद्ध, दहशतवादाविरुद्ध असलेल्या लढाईबद्दल सांगण्यासाठी ते नेते जगभरत गेले ना. ते शिष्टमंडळ गेलं खरं, पण एकही देश या लढ्यात आपल्यासोबत उभा आहे की नाही हे स्पष्ट नाही. पाकिस्तानच्याविरुद्ध कोणीही बोलायला तयार नाही, पण त्याच पाकिस्तान सोबत आता आपण क्रिकेट खेळणार आहोत.

रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं ?

मग आता काय जगभरात पुन्हा शिष्टमंडळ पाठवणार का ? नाही नाही, आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं म्हणणं खोटं होतं, आता या शिष्टमंडळाचं म्हणणं खरं आहे,पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे,आम्ही त्यांच्यासोबत आता क्रिकेट खेळत आहोत,असं ऐकवणार का असा खोच सवालही त्यांनी विचारला. देशापेक्षा तुम्हाला अमित शहांचा मुलगा, त्याच्यासाठी क्रिकेट खेळता का तुम्ही? तिकडे जे सैनिक शहीद झाले, ते नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा जय शाह मोठा आहे का ? असा सडेतोड प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला.

रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं ? असंही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्हाला खेळ महत्वाचा वाटतो, देश महत्वाचा वाटत नाही, हेच देशाचं दुर्दैव आहे, आणि अशीच बोगस जनता पक्षाची लोकं आपल्या डोक्यावर घेऊन आपला देश त्यांच्या हातात दिला आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.