
राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महापौर पदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अनेक अशा महापालिका आहेत तिथे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी वेगवेगळी समीकरण समोर येताना दिसत आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अशातच आता अकोल्यामध्ये भाजपने शिवसेना ठाकरे गटाला युतीची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे. कारण राज्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधक आहेत, मात्र आता अकोल्यात दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार अकोल्यात बहुमताच्या 41 आकड्याची जुळवणी करण्यासाठी भाजपने थेट ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर दिली आहे. भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची अकोल्यात बैठक झाली आहे. आज या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे. 80 सदस्यांच्या अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती होऊ शकते.
अकोल्यात भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला मदततीची मागणी केली आहे. आता ठाकरे गटाकडून उपमहापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या प्रस्तावावर भाजप चर्चा करणार आहे. भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये झालेल्या गुप्त बैठकीची माहितीही समोर आली आहे. शहरातील विकासाच्या महत्त्वाचे मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. जो आमच्या मुद्द्यांवर सकारात्मक भूमिका दाखवेल, त्याच्यासोबत आम्ही जाणार आहे, तसेच सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिली आहे.