मनसेचा थेट एकनाथ शिंदेंना पाठिंबा, आता ठाकरे गटाच्या भूमिकेने खळबळ; राऊत थेट म्हणाले की…
कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यावरच आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे व्यथित आहेत, असे ते म्हणाले आहेत.

Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. महापालिकांच्या निवडणुकीत मनसे पक्षाने सत्ताधारी भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर टीका करून लोकांना मतं मागितली. मुंबईत मराठी अस्मितेच्या मुद्द्याला हात घालून मनसेने सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा मुंबई गुजरातींच्या हातात देण्याचा घाट घालत आहेत, असा दावा मनसेने केला. परंतु आता निकाल लागल्यानंतर हाच मनसे पक्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देत आहे. मनसेच्या या भूमिकेनंतर आता राज्यभरात वेगेवगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत अद्याप त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु ठाकरे गटाने मात्र मनसेच्या या भूमिकेवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे कल्याण डोंबिवलीतील निर्णयाशी सहमत नाहीत, असे सांगितले आहे.
तो निर्णय स्थानिक पातळीवर
संजय राऊत यांनी 21 जानेवारी रोजी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना कल्याण डोंबिवलीतील मनसे-शिंदे गटाची युती याविषयी विचारण्यात आले. यावरच बोलताना, कल्याण डोंबिवलीमध्ये स्थानिक पातळीवर जो निर्णय झालेला आहे, त्यामुळे राज ठाकरे हे व्यथीत आहेत. स्थानिक नेत्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय झालेला आहे. स्थानिक पातळीवर जो निर्णय झालेला आहे, ती माझी भूमिका नाहीये, असे राज ठाकरे यांनी सांगितलेले आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसचे दिले उदाहरण, म्हणाले त्यांनी 12 नगरसेवकांना…
तसेच, कल्याण डोंबिवलीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आलेला आहे. स्थानिक लोकांनी पक्षाच्या भूमिकेविरोधात निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अंबरनाथमध्ये काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपासोबत गेले होते, त्या सर्व नगरसेवकांना काँग्रेसने पक्षातून हाकलून दिले, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अप्रत्यक्ष मागणीही राऊतांनी केली. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
