केडीएमसीत मनसेचा गेमचेंजर प्लॅन, शिंदे गटाला पाठिंबा देण्याआधी राज ठाकरेंचा खास आदेश काय?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. राज ठाकरेंनी स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्या असे आदेश दिल्यानंतर आमदार राजू पाटील यांनी ही महत्त्वाची घोषणा केली.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्ताकारणात अखेर मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कल्याण डोंबिवलीच्या मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिंदे गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे आता केडीएमसीत महापालिकेतील सत्तेची समीकरणे बदलली आहेत. विशेष म्हणजे, हा निर्णय घेताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिक नेत्यांना पूर्णपणे फ्री हँड दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.
राज ठाकरेंचा नेमका आदेश काय होता?
मनसे नेते राजू पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिंदे गटाला पाठिंबा देण्यावरुन विचारणा करण्यात आली होती. यावर राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा खुलासा केला. मी राज साहेबांशी या विषयावर चर्चा केली. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितले की, स्थानिक पातळीवर जी काही परिस्थिती असेल ती नीट समजून घे आणि त्यानुसार निर्णय घे. साहेबांनी आम्हाला स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची पूर्ण मुभा दिली होती, म्हणूनच आम्ही हा पाऊल उचललं आहे, असे राजू पाटील म्हणाले.
राजू पाटील यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यामागे काही महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. भाजप आणि शिंदे गटाच्या जागांच्या आकड्यांमुळे महापालिकेत पळवापळवी आणि घोडेबाजार होण्याची भीती होती. प्रशासकीय कामात गोंधळ होऊ नये आणि एक बाजू स्थिर असावी, यासाठी हा पाठिंबा दिला आहे. तसेच सत्तेबाहेर राहून जनतेला न्याय देणे कठीण होते. सत्तेत सहभागी होऊन किंवा सत्तेला पाठिंबा देऊन आम्ही प्रशासनावर अधिक प्रभावीपणे अंकुश ठेवू शकतो, असे राजू पाटील यांनी म्हटले.
निवडणुकीनंतर अनेक नगरसेवक गायब होण्याच्या घटना घडल्या होत्या. ठाकरे गट आणि इतर गटांच्या नगरसेवकांबाबतही चिंतेचे वातावरण होते, त्यामुळे स्थिरता गरजेची होती. सत्तेतून आम्हाला काय मिळणार यापेक्षा आमची आणि जनतेची कामे होणे जास्त महत्त्वाचे आहे, असे राजू पाटील यांनी स्पष्ट केले.
शिंदे गटाची पकड अधिक मजबूत
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीही या भूमिकेचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारच्या तडजोडी नेहमी होत असतात. स्थानिक पातळीवर काय परिस्थिती आहे, हे तिथल्या नेत्यांना अधिक चांगले माहिती असते. राजू पाटील यांनी घेतलेला निर्णय हा स्थानिक स्तरावरचा विषय असून त्यात काहीही वावगे नाही.” या पाठिंब्यामुळे आता कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
