शिंदेंचा एक डाव आणि सगळेच चितपट, केडीएमसीत ठाकरेच नव्हे तर भाजपलाही दाखवला कात्रजचा घाट? रात्री काय घडणार?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत श्रीकांत शिंदेंची मोठी खेळी! मनसेच्या ५ नगरसेवकांच्या पाठिंब्याने ५८ चे संख्याबळ गाठत त्यांनी भाजपची कोंडी केली आहे. आता केडीएमसीचा महापौर कुणाचा होणार? वाचा सविस्तर.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर कुठे कोणाचा महापौर बसणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांनाही लागली आहे. त्यातच आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळाले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) ५३ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला. त्यांच्यासोबत मनसेचे ५ नगरसेवकही दिसून आले. या ५८ नगरसेवकांच्या बळावर एकनाथ शिंदेंनी केवळ उद्धव ठाकरेंना धक्का दिला नाही, तर सत्तेत बरोबरीचा वाटा मागणाऱ्या भाजपचीही मोठी कोंडी केल्याचे बोलले जात आहे.
नेमकं काय घडलं?
कल्याण-डोंबिवली महापालिकेत (KDMC) सत्ता स्थापनेच्या हालचालींनी अचानक वेग घेतला आहे. आज श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या ५३ नगरसेवकांचा गट अधिकृतपणे स्थापन केला. या प्रक्रियेत मनसेचे ५ नगरसेवकही सहभागी झाले. त्यांनी शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. यावेळी मनसे आमदार राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील मैत्री पुन्हा पाहायला मिळाली. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आहोत, असे स्पष्ट करत मनसेने महायुतीला समर्थन दिले आहे.
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी आम्ही भाजपला सोबत घेऊनच सत्ता स्थापन करणार असा दावाही केला आहे. मात्र प्रत्यक्षात मनसेला सोबत घेतल्यामुळे भाजपच्या बार्गेनिंग क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. यापूर्वी भाजप आणि शिवसेनेमध्ये महापौर पदावरून रस्सीखेच होण्याची शक्यता होती. मात्र, मनसेच्या ५ नगरसेवकांमुळे शिंदेंचे पारडे जड झाले आहे. त्यांनी भाजपला एक चेकमेट दिला आहे.
दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी यावेळी महापौर, उपमहापौर आणि सभापती कोणाचा याबद्दल काहीही स्पष्टपणे सांगितले नाही. महापौर, उपमहापौर आणि सभापती या पदांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. त्यामुळे आता केडीएमसीच्या सत्तेच्या चाव्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहेत. आज किंवा उद्या या दोन नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात सत्तेचे वाटप कसे होणार हे निश्चित होईल. मात्र, श्रीकांत शिंदेंनी ५८ नगरसेवकांचे संख्याबळ आधीच दाखवून दिल्याने आता भाजपला नमती भूमिका घ्यावी लागते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत कोणाचे किती नगरसेवक?
- शिवसेना : ५३
- भाजप : ५०
- उबाठा : ११
- मनसे : ५
- काँग्रेस : २
- राष्ट्रवादी : शरद पवार गट : १
