खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणालबद्दलची आणखी एक मोठं सत्य समोर
छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली येथील खवड्या डोंगरावर झोप उडवणारी घटना घडली. तीन तासाच्या विनवणीनंतरही काहीच होऊ शकले नाही. एका आयफोनसाठी अख्खे कुटुंब उद्धवस्थ झाले. आई-वडिल आणि मुलाचा जीव गेला.

छत्रपती संभाजीनगरमधील देवळाली परिसरात दुर्देवी घटना घडली. एका आयफोनसाठी मुलगा, वडील आणि आईचा मृत्यू झाला. मुलाच्या एका जिद्दीने संपूर्ण कुटुंब उद्धवस्थ झाले. मुलगा कुणाल चांदगुडे वय 19 वर्ष, वडील मुरलीधर चांदगुडे वय 48 वर्ष आणि आई संगीता चांदगुडे अशी या घटनेतील मृतांची नावं आहे. आयफोन 15 साठी मुलाचा आई वडिलांसोबत वाद झाला. त्यानंतर तो थेट खवड्या डोंगरावर कुणाल पोहोचला. कुणाल आत्महत्या करण्यासाठी डोंगरावर पोहोचला. तो आत्महत्या करणार हे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी आणि आई वडिलांनी त्याला रोखले, असे पाऊल न उचलण्याची सर्वजण विनवणी त्याच्याकडे करत होते. पण तो कोणाचेही काहीही ऐकण्यास तयार नव्हता. त्याला वाचवण्यासाठी सर्वांची धडपड सुरू होती. वडिलांनी पुढे येत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.
त्याच क्षणी मुलाने खाली उडी मारली. त्याच्या मागे वडिलांनीही उडी घेतली. मुलाला आणि नवऱ्याला दरीत पडताना पाहून आईनेही कोणताही विचार न करताना दरीत उडी घेतली. आता यानंतर धक्कादायक माहिती पुढे येतंय. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हा गेल्या वर्षी याच डोंगरावरती जीव देण्यासाठी आला होता. एमआयडीसी वाळूज आणि चिकलठाणा पोलिसांनी त्याची समजूत काढली.
त्यानंतर त्याला डोंगराहून खाली सुरक्षित नेण्यात आले. वर्षभरानंतर कुणाल याने हाच डोंगर गाठला. मात्र, आई वडिलांनी अनेक विनवणी करूनही यावेळी कुणाल ऐकण्यास तयार नव्हता. कुणाल याला आई, पोलिस आणि उपस्थित नागरिकांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असलेल्या एका सरपंचाने मी तुला आयफोन 15 घेऊन देतो म्हणत त्याला आत्महत्या नको करू म्हणून समजावले.
कुणाल हा डोंगरावर असताना अग्निशमन दलाकडून जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, कुणाल हा वारंवार जागा बदल होता. मुलाला वाचवण्यासाठी आईने प्रचंड प्रयत्न केला. पण तो ऐकत नव्हता. वडिलांना मी सोडते, आपण दोघे वेगळे राहू, त्यांच्यासोबत नाही, असेही कुणालची आई म्हणताना दिसली. मात्र, कुणाल काहीच ऐकत नव्हता.