तिची उंची 5 फूट, तरीही 3 फुटांवर… सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाला थरारक वळण; हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?

सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाने अंबरनाथ हादरले. वडिलांचा विज्ञानाच्या आधारे मोठा दावा, तर बहिणीने उपस्थित केले मोबाईल गायब होण्याबाबत प्रश्न. आरोपी भगवान लोटेला अटक होणार का? वाचा ताजी अपडेट.

तिची उंची 5 फूट, तरीही 3 फुटांवर... सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाला थरारक वळण; हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?
ambernath case
| Updated on: Apr 29, 2026 | 9:03 AM

अंबरनाथ येथील प्रसिद्ध S-3 पार्क हॉटेलमध्ये झालेल्या सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाने आता एक वेगळे आणि गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भगवान लोटे याने अटकेपासून वाचण्यासाठी कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. तर दुसरीकडे सिमरनच्या कुटुंबियांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप केला आहे. त्यामुळे भगवान लोटेचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. तसेच पीडित कुटुंबाने तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

सिमरनच्या वडिलांनी न्यायालयात अर्ज सादर केला आहे. या अर्जामध्ये त्यांनी हॉटेलमधील परिस्थितीवर आक्षेप नोंदवला आहे. सिमरनची स्वतःची उंची ५ फूट ३ इंच होती. ज्या पंख्याला किंवा जागेला तिने गळफास घेतल्याचा दावा पोलीस करत आहेत, त्याचे जमिनीपासूनचे अंतर केवळ ३ ते ३.५ फूट आहे. विज्ञानाच्या आणि तर्काच्या निकषावर इतक्या कमी उंचीवर कोणतीही व्यक्ती गळफास घेऊ शकत नाही, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. या एका मुद्द्यावरून हे प्रकरण आत्महत्येचे नसून हत्येचे असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.

पुरावे नष्ट केल्याचा संशय 

सिमरनच्या बहिणीने आरोपी भगवान लोटेच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. घटनेच्या वेळी लोटे तिथे उपस्थित होता, तरीही त्याने सर्वात आधी पोलिसांना का बोलवले नाही? असा सवाल तिने केला आहे. सिमरनकडे कार्यालयाचे चार मोबाईल फोन होते, जे आरोपीने आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. हे फोन पोलिसांच्या हवाली का केले नाहीत, यात नक्की कोणते रहस्य दडले आहे? सिमरनला मिटिंगच्या बहाण्याने हॉटेलवर बोलावले गेले आणि तिथेच तिचा घातपात झाला, असा संशयही बहिणीने व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर शवविच्छेदन अहवाल (Post-Mortem Report) मिळण्यास झालेला १० दिवसांचा उशीर झाला. हा विलंब संशयाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला आहे. वेळेत अहवाल न मिळणे आणि तपासात होत असलेली दिरंगाई ही आरोपीला वाचवण्यासाठी चाललेली धडपड आहे, असा आरोप कुटुंबाने केला आहे. भगवान लोटे हा राजकीय क्षेत्रात सक्रिय असल्याने पोलीस प्रशासन, हॉटेल व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकला जात असल्याची भीती कुटुंबाने व्यक्त केली आहे.

पीडित कुटुंबाचे वकील ॲड. सरोदे यांनी सांगितले की, “पोलिसांनी सुरुवातीला केवळ कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, जो पुरेसा नाही. आम्हाला कुटुंबाचा पुरवणी जबाब नोंदवून हत्येचे कलम (३०२) समाविष्ट करायचे आहे. जर सत्र न्यायालयात न्याय मिळाला नाही आणि पुन्हा शवविच्छेदन करण्याची मागणी मान्य झाली नाही, तर थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी या कुटुंबाने केली आहे.

२ मे रोजी काय होणार?

भगवान लोटेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २ मे रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. या दिवशी न्यायालय आरोपीला दिलासा देते की पीडित कुटुंबाची हत्येच्या तपासाची मागणी मान्य करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

Follow Us