Anjali Damania : पार्थ पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता अंजली दमानिया यांच्या रडारवर
Anjali Damania : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या नेहमीच भ्रष्टाचाराची विविध प्रकरणं बाहेर काढत असतात. आतापर्यंत त्यांनी सरकारमधील खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधला मोठा मंत्री त्यांच्या रडारवर आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मागच्या काही काळात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण बाहेर काढत गंभीर आरोप केले होते. खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांनी लक्ष्य केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा प्रकरणाचा विषय लावून धरला. आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेत त्यांच्या टार्गेटवर आहे. आधीच अजित दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात विसंवाद दिसून येत आहे. आता अंजली दमानिया पुन्हा एकदा राष्ट्रवादीला टार्गेट करणार आहेत. त्यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आले आहेत.
साडेचार हजार कोटींच्या रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात मोठी टक्केवारी मागितली जात असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. गेली 26 वर्षे वारंवार त्याच त्याच कंपन्यांना धान्य वाहतुकीचे काम दिले जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. संबंधित कंत्राट रद्द करण्याची अंजली दमानिया यांची सरकारकडे मागणी. हायकोर्टाने वर्क ॲार्डर देवू नये म्हणून सांगितले असतानाही टक्केवारीसाठी वर्क ॲार्डर काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जादा व्याजदरासाठी नियम धाब्यावर बसवून फसवणूक
फक्त छगन भुजबळ यांच्यावरच नाही, अंजली दमानिया यांनी MSRD चे चेअरमन अमिल कुमार गायकवाड यांच्यावर देखील घोटाळ्याचा आरोप केला आहे. एचडीएफसी बँकेत 45 कोटींची ठेवी देऊन आरबीआयच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. जादा व्याजदरासाठी नियम धाब्यावर बसवून फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पार्थ पवारांबद्दल काय बोललेल्या?
काही दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी पार्थ पवार यांच्यावर बोचरी टीका केली होती. “अजित पवार यांच्या नंतर आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत, अशी भावना पार्थ पवार यांच्या वागण्यातून दिसते. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते स्वतःची वेगळी गँग घेऊन फिरत आहेत” अशी बोचरी टीका दमानिया यांनी केली होती.
रुपाली चाकणकर यांच्याबद्दल काय बोललेल्या?
भोंदू अशोक खरात प्रकरणातही अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केलं होतं. “सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. सुनील तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठिशी खंबीर उभे होते” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता.