सोलापूर | 11 ऑगस्ट 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या निर्णयाला समर्थन दिलेलं नाही. याउलट अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या सर्व नेत्यांचा भाजपसोबत जाण्याचा वैयक्तिक निर्णय आहे. संबंधित निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत निर्णय नाही, असं शरद पवार यांनी आधीच जाहीर केलंय. पण तरीही काही घडामोडी अशा घडत आहेत की त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण येत आहे.
पुण्यात काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला शरद पवार हे प्रमुख पाहुणे होते. शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाऊ नये, यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील विनंती केली होती. पण आपल्या मित्रपक्षांची विनंती न ऐकता शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित होते.
पुण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर एकत्र दिसले होते. यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर हात ठेवला होता. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या मंचावरील भेटीच्या त्या प्रसंगाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली होती. या कार्यक्रमानंतर आता पुन्हा शरद पवार आणि भाजपचे वरिष्ठ नेते एकाच मंचावर एकत्र दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या सांगोला येथे अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हजेरी लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार सत्तेत सहभागी होण्याच्या अगदी काही दिवसांआधी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली होती. त्यामुळे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र येण्याच्या कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झालंय.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी 13 ऑगस्टला आयोजित करण्यात आलाय. याच कार्यक्रमात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्रित येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार आणि फडणवीस प्रत्यक्ष समोरासमोर भेटीची ही दुसरी वेळ असणार आहे.