राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळली, पण पुन्हा जेलमध्येच मुक्काम

| Updated on: Feb 24, 2023 | 10:04 PM

मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम (Ramesh Kadam) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळली, पण पुन्हा जेलमध्येच मुक्काम
Follow us on

सोलापूर : मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम (Ramesh Kadam) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या कर्ज योजनेतून आजीच्या नावे पदाचा गैरवापर करून कर्ज घेऊन अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या अपहाराच्या प्रकरणात पोलिसांनी रमेश कदम यांना अटक केली होती. त्यानंतर सोलापूर कोर्टाने त्यांना तीन दिवस पोलीस कस्टडी दिली होती. मात्र आज झालेल्या युक्तिवादात त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

आरोपी माजी आमदार रमेश कदम यांच्या वकिलाने केलेल्या युक्तीवादामुळे पोलिसांनी मागितलेली दोन दिवसांची पोलीस कस्टडी नाकारण्यात आली आहे. रमेश कदम यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने आपली आजी बायमा गणपत यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे.

नेमकं प्रकरण काय?

रमेश कदम यांनी दुग्ध व्यवसायाचे कर्ज मंजुरीचे बेकायदेशीर आदेश तयार करून कर्ज मंजूर केलेले आहे, असे खोटे भासवून ते खरे म्हणून वापरले, असा आरोप आहे. त्यांनी महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे आणि इतरांवर दबाव टाकला आणि 4 लाख 75 हजार रुपयांचा धनादेश दिला. त्यावरून महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी 31 मे 2017 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.

हे सुद्धा वाचा


पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, सदर प्रकरणाच्या तपासासाठी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. रमेश कदम यांच्यातर्फे युक्तिवाद करताना वकिलांनी आरोपीकडून काहीही हस्तगत करण्याचे नसल्याने तसेच सदरचा गुन्हा हा कागदोपत्री पुराव्याचा भाग असल्याने पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद मांडला.

त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी पोलिसांनी मागणी केलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी फेटाळून लावली. त्यांनी आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले. कोर्टात आज आरोपीतर्फे वकील मिलिंद थोबडे, विनोद सूर्यवंशी, दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे वकील दत्तूसिंग पवार यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला.