अदानींवर विरोधकांची आगपाखड, पण पवार कुटुंबातील ‘या’ तरूण नेत्याचं समर्थन?

एकीकडे काँग्रेस आणि इतर विरोधक अदानींवर झालेल्या आरोपांवर सरकारला प्रश्न करतायत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कुटुंबातील युवा नेत्याकडून केलं जातंय समर्थन?

अदानींवर विरोधकांची आगपाखड, पण पवार कुटुंबातील या तरूण नेत्याचं समर्थन?
| Updated on: Feb 09, 2023 | 11:47 PM

मुंबई : काँग्रेससह विरोधकांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरुन अदानी आणि मोदी सरकारला टार्गेट केलंय. दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी मात्र अप्रत्यक्षपणे अदानींचं समर्थन केलंय. इकडे मुंबईत धारावीचा जो पुनर्विकास प्रकल्प अदानींकडे जाणार आहे. तो देण्याआधी अदानी समुहाचं आर्थिक स्थैर्य तपासावं, अशी मागणी मनसेनं केलीय.

एकीकडे काँग्रेस आणि इतर विरोधक अदानींवर झालेल्या आरोपांवर सरकारला प्रश्न करतायत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी अदानींचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय त्यामुळे याबद्दल राष्ट्रवादी पक्षाची अधिकृत भूमिका काय. याबद्दल चर्चा होऊ लागलीय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अद्याप अदानी समुहावरच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही. 4 दिवसांपूर्वी अजित पवारांनी अदानींवरच्या आरोपांवर सरकारनं उत्तर देण्याची मागणी केली होती. तर आता रोहित पवारांनी हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरुन अदानींचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी उद्योजक गौतम अदानी बारामती दौऱ्यावर होते. तेव्हा खुद्द रोहित पवारांनीच गाडीचं सारथ्य केलं. जवळपास त्याच काळात अदानींनी मुंबईत राज ठाकरेंच्या निवासस्थानीही भेट घेतली होती आणि सध्या जो वाद उद्भवलाय. त्यावर रोहित पवारांनी अदानींची अप्रत्यक्ष बाजू घेतलीय. तर मुंबईतल्या धारावीचा जो पुनर्विकास प्रकल्प अदानींना मिळालाय. त्याची सुरुवात करण्याआधी अदानी समुहाचं आर्थिक स्थैर्य तपासा अशी मागणी मनसेच्या संदीप देशपांडेंनी केलीय.

महत्वाची गोष्ट म्हणजे ईडीच्या कारवाया राजकीय सुडापोटी होतात, हा आरोप विरोधक करत आले आहेत. यावेळी रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे हिंडेनबर्गच्या रिपोर्टची तुलान ईडीशी केलीय. रोहित पवार हे आमदाराबरोबरच एक उद्योजकही आहेत. जेव्हा रोहित पवारांनी राजकारणात पाऊल टाकलं. तेव्हा महाराष्ट्रानं एक चांगला उद्योजक गमावला अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी एका मुलाखतीत दिली होती.

दरम्यान रोहित पवारांनी अदानींबद्दल मांडलेल्या भूमिकेचं भाजपनं स्वागत केलंय आणि राजकारणासाठी उद्योजकांना टार्गेट न करण्याचा सल्लाही दिलाय तूर्तास रोहित पवारांच्या भूमिकेबद्दलराष्ट्रवादी पक्षाची भूमिका काय याची प्रतीक्षा आहे.