मोठा अनर्थ टळला, शाळेचा स्लॅब कोसळला, 13 विद्यार्थी थोडक्यात बचावले, कुठे घडली घटना?

Solapur Akkalkot ZP Kannada School Slab Collapse: सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळले. यावेळी विद्यार्थी या परिसरातच होते. त्यातील 13 विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दैवबलवत्तर म्हणून हे विद्यार्थी वाचले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

मोठा अनर्थ टळला, शाळेचा स्लॅब कोसळला, 13 विद्यार्थी थोडक्यात बचावले, कुठे घडली घटना?
शाळेचा स्लॅब कोसळला, 13 विद्यार्थी थोडक्यात बचावले
| Edited By: | Updated on: Aug 12, 2026 | 9:48 AM

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषद शाळेत मोठी दुर्घटना टळली. 25 वर्षे जुनी असलेल्या शाळेच्या इमारतीच्या छताचा काही भाग कोसळला. जिल्हा परिषद शाळेच्या पोर्चमधील स्लॅबचा थर कोसळून 13 विद्यार्थी आणि दोन शिक्षक जखमी झाले. अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावातील शाळेतला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. दैवबलवत्तर म्हणून हे विद्यार्थी बचावले. आता शाळेची इमारत नव्याने बांधण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

स्लॅब कोसळल्याने 13 विद्यार्थी जखमी

या शाळेची इमारत 25 वर्षे जुनी असल्याने स्लॅबचा काही थर विद्यार्थ्यांच्या अंगावर पडला. त्यात 13 विद्यार्थी जखमी झाले. दोन शिक्षकही या घटनेत जखमी झाले. सोलापूर जिल्हा परिषदेची कन्नड माध्यमाच्या शाळेत हा प्रकार घडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ॲम्बुलन्ससह जिल्हा परिषदेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. हा प्रकार काल दुपारच्या सुमारास घडला असून घटनेतील विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. दरम्यान पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनी शाळेची इमारत नव्याने बांधण्याची मागणी केली आहे.

शाळेच्या आवारात एकच धावपळ

बबलाद येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची कन्नड माध्यमाची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत एकूण 250 पेक्षा अधिक विद्यार्थी शिकतात. मंगळवारी सकाळी शाळेची प्रार्थना झाली. त्यानंतर विद्यार्थी रांगेत त्यांच्या वर्गखोल्यांकडे जात होते. वरांड्यातील काँक्रीटच्या छताचा एक मोठा भाग अचानक त्यावेळी खाली कोसळला. हा स्लॅबचा ढिगारा अचानक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अंगावर कोसळला. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. अनेकांची धावपळ उडाली. काहींनी आरोळ्या ठोकल्या. काही जण भेदरले. काहींना अश्रु अनावर झाले. हा प्रकार समजताच गावकरी धावून आले. शिक्षकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच मदतकार्य सुरू केले. विद्यार्थी आणि शिक्षकांना दूर करण्यात आले.

या घटनेत रमेश शिवमूर्ती आणि भीमण्णा गवळी हे शिक्षक आणि 13 विद्यार्थी जखमी झाले. 4 विद्यार्थ्यांच्या डोक्याला खोच पडली. त्यांना तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. औषधोपचार आणि मलमपट्टीनंतर विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान इमारतीचे नुतनीकरण करण्याची आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकाराबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे की नाही असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us