
सोलापूरात काँग्रेसला शिंदे शिवसेनेने दे धक्का दिला आहे. शिवसेना पश्चिम महाराष्ट्रातील बुरूज मजबूत करत आहे. त्यात त्यांना सोलापूरात मोठा शिलेदार सामील होत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना अजून मजबूत होईल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच मोठी घडामोड घडल्याने महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. बडे नेत्यांचे महायुतीमधील इनकमिंग तर महाविकास आघाडीतून आऊटगोईंग सुरू असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक चुरशीची होणार आहे.
काँग्रसेला मोठा धक्का
सोलापूरात काँग्रेसला जबरदस्त राजकीय धक्का बसला आहे. माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चेमुळे मुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सिद्धाराम म्हेत्रे हे काँग्रेसचे माजी आमदार आणि गृहराज्यमंत्री राहिले आहेत. म्हेत्रे शिवसेनेत गेल्याने काँग्रेस जिल्ह्यातून खिळखिळी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यात मोठी घडामोड
सोलापूर महानगरपालिकेसह जिल्ह्यामधील बार्शी, पंढरपूर, अकलूज, करमाळा, कुर्डुवाडी, मंगळवेढा, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ, सांगोला या 11 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये निवडणुकीचा बिगूल वाजत आहे. अक्कलकोट, मैंदर्गी, दुधना नगरपरिषेदसाठी पण स्थानिक समीकरणं महत्त्वाची ठरणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यापूर्वीच महाविकास आघाडीला सुरूंग लावण्याचे काम सुरू झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरात महायुती आणि महाविकास आघाडीत चुरस दिसून येत आहे. फोडाफोडीच्या राजकारणासह आता एकमेकांना शह देण्यासाठी स्थानिक मुद्यांना हवा देण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका न झाल्याने कार्यकर्ते, नेते अस्वस्थ होते. आता त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत मोठी रसद मिळणार आहे. त्यांना एकमेकांचे उट्टे काढण्याची आयती संधी मिळणार आहे.
अनेक राजकीय हिशोब चुकते होणार आहेत.