पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केला काठी फिरवण्याचा विश्वविक्रम; इतके तास सलग फिरवली काठी

| Updated on: Mar 09, 2023 | 11:09 AM

गार्गी चव्हाण ही यापूर्वी गणेशोत्सवामध्ये काठी फिरवत होती. मात्र तिला व्यासपीठ उपलब्ध नव्हते. सोलापूर जिल्हा लाठी काठी असोसिएशनने तिचा हा पैलू ओळखून तिला प्रशिक्षण दिले. त्यानंतर तिने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने केला काठी फिरवण्याचा विश्वविक्रम; इतके तास सलग फिरवली काठी
गार्गी चव्हाण
Follow us on

सोलापूर : महिला दिनानिमित्त सोलापुरातील 11 वर्षीय मुलीने अनोखा विश्वविक्रम केला. गार्गी राज चव्हाण या पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हा विश्वविक्रम केला आहे. या विश्वविक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये होणार आहे. गार्गी चव्हाण ही यापूर्वी गणेशोत्सवामध्ये काठी फिरवत होती. मात्र तिला व्यासपीठ उपलब्ध नव्हते. सोलापूर जिल्हा लाठी काठी असोसिएशनने तिचा हा पैलू ओळखून तिला प्रशिक्षण दिले. त्यानंतर तिने हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

आता गार्गीचा हा मानस

लाठी-काठी हा शिवकालीन खेळ असून तो जगासमोर यावा यासाठी हा रेकॉर्ड केला आहे. सकाळी 11:40 मिनिटांनी गार्गीने लाठी फिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर सायंकाळी 6:47 पर्यंत लाठी चालवली. सलग 7 तास 7 मिनिटे आणि 7 सेकंद न थांबता लाठी-काठी फिरवण्याचा रेकॉर्ड केलाय. यापुढे दहा तास लाठी चालवण्याचा रेकॉर्ड करण्याचा मानस गार्गी चव्हाणने बोलून दाखवला आहे. गार्गीच्या या रेकॉर्डनंतर उपस्थित त्यांनी आनंद उत्सव करून तिचा सन्मान केला.

मोबाईल, टीव्हीतून पडा बाहेर

भारतीय लाठी महासंघ उपाध्यक्ष शिवराम भोसले म्हणाले, मोबाईल आणि टीव्हीतून बालमहिला बाहेर पडाव्यात, असं गार्गीला यातून सांगायचं आहे. त्यासाठी तिने जागतिक रेकॉर्ड करण्याची इच्छा दाखवली. तो रेकॉर्ड तिने पूर्ण केला आहे. लाठी-काठी हा शिवकालीन खेळ आहे. रस्त्यावर गल्लीबोळीत लाठी फिरवत होते. आतापर्यंत त्याला स्टेज नव्हता. बेस नव्हता. लाठी काठी संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्र आलो. आम्ही लाठीचा अभ्यासक्रम तयार केला. केंद्र सरकारला हा अभ्यासक्रम सादर केला. शालेय अभ्यासक्रमातही या खेळाचा समावेश झाला आहे. हा खेळ मिनिस्ट्रीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

बुधवार, रविवार केला सराव

संस्थेचे प्रशिक्षक अश्विन कटलासकर यांनी १५ ऑगस्ट रोजी ७५ मिनीटं लाठी फिरवण्याचा एक विक्रम केला होता. गार्गी ही आवडती विद्यार्थिनी आहे. तो रेकॉर्ड बघून तिनेही सराव केला. पालकांनी इच्छा व्यक्त केली. वर्ल्ड रेकॉर्ड करणार असल्याचं कळलं. त्यानंतर प्रशिक्षक घर बुधवार आणि रविवार घरी जाऊन तिचा सराव घेत होते. शाळेनेही मदत केली. तिला बुधवारी सुटी दिली. त्यामुळे ती योग्य सराव करू शकली. आठ तास सराव करत होती.

गार्गी म्हणते, राज्याचा पारंपरिक खेळ देशात न्यायचा होता. लाठी सात तासांवर फिरवली. महिला दिनानिमित्त या चिमुकलीनं रेकॉर्ड केला. वर्षभरापासून ती सराव करते. यापुढं अकरा तास लाठी फिरवण्याचा सराव करण्याचा मानसही गार्गीने व्यक्त केला.