औरंगजेबाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्यानंतर अबू आझमी नरमले, म्हणाले “मी कोणत्याही महापुरुषाबद्दल…”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. आता अखेर अबू आझमी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केलेले विधान मागे घेत असल्याचे सांगितले.

औरंगजेबाबद्दल केलेल्या त्या वक्तव्यानंतर अबू आझमी नरमले, म्हणाले मी कोणत्याही महापुरुषाबद्दल...
abu asim azami
| Updated on: Mar 04, 2025 | 5:04 PM

समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. “औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. तो उत्तम प्रशासक होता”, असे विधान अबू आझमी यांनी केले होते. अबू आझमी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. यानंतर दोन्हीही सभागृहात अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांच्या या विधानानंतर अबू आझमींच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली होती. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणी केली. आता अखेर अबू आझमी यांनी एक व्हिडीओ शेअर करत केलेले विधान मागे घेत असल्याचे सांगितले.

“माझ्या वक्तव्याची तोड-मोड करुन ते सादर करण्यात आलं”

अबू आझमी यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो असे म्हटले आहे. “माझ्या वक्तव्याची तोड-मोड करुन ते सादर करण्यात आलं आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केले, जे इतिहासकारांनी आणि लेखकांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो, असे अबू आझमी यांनी म्हटले.

माझं वक्तव्य एक राजकीय मुद्दा बनलं आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय.” असेही अबू आझमी म्हणाले.

“माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला”

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा, यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी, असेही अबू आझमींनी म्हटले.

“यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो”

“मी औरंगजेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केलं होतं. परंतु, त्या वक्तव्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब व्हायला नको होतं. विधीमंडळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. जनतेची कामं प्रलंबित आहेत. विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो”, असेही अबू आझमी म्हणाले.