Special Story | गौरव फाऊंडेशन! दिव्यांग, वृद्धांच्या आयुष्यात आनंद फुलवणारी माणसं

जे दिसतं ते आपण पाहतो, पण काही माणसं जे दिसत नाही ते पाहतात. आपण जवळचे पाहतो पण ही माणसं खूप लांबचं पाहतात (Story of Gaurav foundation).

Special Story | गौरव फाऊंडेशन! दिव्यांग, वृद्धांच्या आयुष्यात आनंद फुलवणारी माणसं
Follow us
| Updated on: Feb 07, 2021 | 8:33 AM

मुंबई : जे दिसतं ते आपण पाहतो, पण काही माणसं जे दिसत नाही ते पाहतात. आपण जवळचे पाहतो पण ही माणसं खूप लांबचं पाहतात (Story of Gaurav foundation). अशाच माणसांची एक संस्था म्हणजे गौरव फाऊंडेशन! सकारत्मकतेच्या चष्म्याने अंधारात उजेड शोधते. वाळवंटात नंदनवन फुलवते. जीवन खूप सुंदर आहे. येथे खूप चांगली माणसं आहेत. नवीन पिढी खूप शार्प आहे. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे, असा आनंद पसरला आहे. त्याला शोधून काढा आणि जीवनाला मस्तपैकी सजवून काढा. असा संदेश देत आनंद यात्रेत रंगण्याचे आणि रंगवण्याचे काम ही संस्था करते. या संस्थेचे सर्वेसर्वा मोहनदास भामरे (भामरेबापू) यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी संस्थेच्या कामांविषयी सविस्तर माहिती दिली.

भामरेबापू यांनी सांगितलेली माहिती आम्ही त्यांच्याच शब्दांमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्याआधी आम्ही तुम्हाला भामरेबापू यांच्याविषयी माहिती सांगणार आहोत. भामरेबापू यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 रोजी धुळे जिल्ह्यातील वायपूर या खेडेगावात झाला. घरात गिरिबीची परिस्थिती होती. त्यांचे मोठे भाऊ नोकरी करायचे. त्यांची जशी बदली व्हायची त्यानुसार बापूसाहेब देखील एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जायचे. बापूसाहेब यांनी उच्च शिक्षण घेतलं आणि ते एसटी डेपोत रुजू झाले. या काळात त्यांनी अनेकांना मदत केली. एकदा त्यांनी एका हताश व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून वाचवलं. तेव्हापासून त्यांना या समाजकार्याची गोडी लागली.

“आम्हाला १९८७ सालात बहुत प्रयासाने व प्रतिक्षेने पुत्र प्राप्तीचा आनंद झाला. आईबाप होण्याचे भाग्य लाभले व गौरव प्राप्त झाला म्हणुन आम्ही बाळाचे नाव ठेवले गौरव! परंतु सटवीला पुजलेल्या संघर्षाने तोंड वर काढले आणि गौरवच्या नशीबी दिव्यांगता आली. स्वतः हे दुःख अनुभवल्याने व त्यावर मात करण्याचे तंत्र मंत्र कळाल्याने तेच दुसर्‍यांना द्यावे म्हणून आम्ही या दिशेकडे वळलो”, असं भामरेबापू सांगतात.

गौरव फाऊंडेशन विषयी भामरेबापू यांनी सांगितलेली माहिती:

कुणाच्याही नजरेत भरणार नाही की कुणी सहज ओळखणारही नाही अशी संस्था. पण तरीही आपल्या स्वत्वाच्या स्वयंप्रकाशीत आस्तित्वाने चमकते आहे. कधी पेपरात प्रसिध्दी नाही. कुठलाही स्वार्थ नाही. पैसा देणे नाही, घेणे नाही. या उलट प्रसंगी गांठची पदरमोड करुन आपले कार्य करत आहे. नोंदणीपुरतच मर्यादित पदे, बाकी सर्वच जण पदाधिकारी. कुणीही मोठं नाही की कुणी लहान नाही. म्हटलं तर सर्वच अध्यक्ष म्हटलं तर सर्वच कार्यकर्ते. आणि हे सर्व सांभाळणारे तरुण, सळसळणारे, ऊत्साही मंडळीचे वय काहीच विशेष नाही. अवघे “साठी” ओलांडलेले तरुण.

उमर पचपणकी पर दिल बचपणका, असंही त्यांना चिडवले जाते. दुखणारे गुडघे, बीपी डायबेटीसने त्रस्त… पण या व्याधी कधीच त्यांच्या कर्माच्या आड येत नाही. येत नाही असं म्हणण्यापेक्षा ते आपल्या कार्यात एवढे गढुन जातात की तिकडे त्यांचं लक्षच जात नाही, मग मिशन संपल्यावर रात्री ते घरच्यांचा रोष पत्करुन हळूच गुडघ्यांना बाम चोपडतात, किंवा आठवणीने चुकलेला गोळ्यांचा डोस घेतात.

काय करतात हो ही मंडळी? व्यवहारी जगाचा रास्त प्रश्न त्यांना विचारला जातो. ते डगमगतात..बावरतात आणि त त फ फ करत निरुत्तर होतात. कारण स्वार्थ, हेतू, लालच यांच्या साच्यात धुर्तपणे बसवलेले कार्य दाखवण्याची किमया त्यांना जमली नाही. त्यांचे कार्यच आगळेवेगळे आहे. दिसायला काहीच नाही. सांगावं असं सहजही नाही. थोडक्यात सांगण्यासारखं ही नाही. मग काय? “आम्ही कुठे काय काम करतो? जे जे दिसतं,जे जे जाणवतं, जे जे वाटतं ते ते आम्ही करतो, जेथे जेथे गरज भासते तेथे तेथे जावं. गुपचुप आपलं दिलासा देण्याचं, सहकार्य करण्याचं मिशन साध्य करावं आणि गुपचुप घरी यावं. सकाळी काही ठरवुन निघत नाही की आगाऊ प्लॅनींग करुन काम करीत नाही. कुणालाच काही कळायच्या आत आमचं काम संपलेलं असतं हो. हे त्यांचं नम्र उत्तर असते.

हवा दिसत नसली तरी तिचं आस्तित्व मात्र असतच असतं तसच हे आहे. ही एक संस्था नसून विचार पेहरणारे एक हिरतं फिरतं व्यक्तीमत्व आहे. अंध,अपंग, अनाथ, मतीमंद यांच्याकडे जाऊन त्यांना हसवणं, त्याच्यात रमणं, त्यांच्यासाठी दानशूर लोकांकडून मिळालेले कपडे, साहित्य, खाऊ, जेवण देणं. देणारे आणि घेणारे यांच्यामधील दुवा म्हणजे गौरव फाऊंडेशन!

देणार्‍याला कुठे द्यावे हे कळत नाही आणि गरजूंना कुठे मिळेल हे कळत नाही. या दोघांना जोडणारा पूल म्हणजे गौरव फाऊंडेशन! अनाथ अपगांना खायला मिळतेही खूप पण त्यांची शारीरिक स्वच्छता करणे महत्त्वाचे असते. अशावेळी सणासुदीला त्यांची आंघोळ करायची. त्यांना तेल लावावे. भांग पाडावा आणि त्यांचे आई, बाप, भाऊ, बहीण बनून त्यांना आनंद द्यावा. रक्षाबंधनला राख्या बांधाव्यात, नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान घालावे, भाऊबीजेला ओवाळावे, दिवाळीला फटाके फोडावे, पणत्या लावाव्या आणि त्यांच्यासाठी खर्‍या अर्थाने एक “घर “बनावे.

पुढचं काम म्हणजे वृध्दांचा वृध्दापकाळ आनंदी करणं. उदास वृध्दाजवळ जाऊन त्याला हसवणं. मदतीचा हात देणं, जमेल तशी किडुक मिडुक आर्थिक मदत करणं. गरजवंताला हळुच भजी, कचोरी, पोहेंचा नाश्ता देऊन येणे. जमलं तर त्याच्या सोबत खाणे. सकाळ,संध्याकाळ ज्येष्ठ नागरीकांसोबत हसी मजाक करणे, गाणी म्हणणे, विनोद सांगणे आणि कळत नकळत जीवनाचा आस्वाद कसा घ्यावा? वाळवंटातही हिरवळ कशी शोधावी? मावळतीच्या मलुल कॅनव्हासवर ऊगवतीचे रंग कसे ऊधळावैत?

आनंदी राहण्याची आणि वृध्दापकाळ मजेत जगण्याची कला शिकवणे. सहज चालता बोलता ही अमृताची कुपी देऊन यावी. बाबारे वय वाढतं, ढेरी वाढते, वजन वाढते, बीपी वाढतो, शुगर वाढते या सर्व वाढावाढीमध्ये आपण कसं लहान बनावं. आनंद कसा बिलंदर असतो. त्याचा साचा कसा अरुंद असतो. अशा आनंदाच्या साच्यात बसण्यासाठी कसं लवचिक बनुन, लहान बनून फिट बसावं, मुलांशी, नातवंडाशी कशी तडजोड करावी हे सर्व बिंबवुन यायचं. सरळ सरळ उपदेश न करता गोष्टींच्या माध्यमातून हे साध्य करायचे काम हे फाऊंडेशन करते. त्यासाठी वेगवेगळे लेखण करते.

खचलेल्याला सावरणं, रडवेल्याला हसवणं, दुःखाला गोंजारणं, पसरलेल्याला आवरणं नवीन पिढीला सदान् कदा दोष देणार्‍या जुन्या पिढीला समजवुन सांगणे आणि जुन्या पिढीकडे तिरस्काराने पाहणार्‍या नवीन पिढीला महत्व सांगणे ही कामे ही संस्था करते. अगदी विनामुल्य! चालतं फिरतं दुकानच म्हणाना.. जो देगा ऊसका भला. जो ना देगा उसका भी भला, अशी रस्त्यावरची फकीरी आणि स्वतः उपासी राहून दुसर्‍याला भरवण्याची मनातली अमीरी घेऊन काम करणारी ही वेडी माणसं..बालपणीच्या पुंगीवाल्याच्या गोष्टी सारखी. ऑफीस नाही, बोर्ड नाही, नोकर नाही, चाकर नाहीत. बस्स.. चार पांच उत्साही, समाजसेवी, समविचारी ज्येष्ठांना सोबतीला घेऊन निघायचं. ना इज्जत की चिंता, ना फिकर कोई अपमानकी, जय बोलो हनुमानकी, अशा बेफिकीर वृत्तीने हे काम चालतं.

घरच्या व्यथा, विवंचना, अंतरीचे दुःख, शारीरिक पिडा सर्व बाजूला ठेऊन आधी लगीन कोंडाण्याचे या भावनेने काम करणारे हे मावळे. तिसरे महत्वाचे काम म्हणजे नवीन पिढी. प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतांना या हायफाय डिजीटल युगात आपण आपली बेसीक मुल्येच हरवतो आहोत. ज्या मुल्यांवर आधारीत असलेला भारतीय संस्कृतीचा पाया वर आपली बुलंद इमारत उभी आहे तो पायाच आता ढासळत असल्याचे दिसते. घराघरातलं घरपण विस्कळीत झाले. संवाद संपला.

चंगळवाद फोफावला, बेगडी आणि भ्रामक जगाच्या मृगजळामागे आपण धावतोय. व्यसनाधिनता वाढली. अवास्तव गरजा वाढल्या, त्यासाठी पैशांचे नको तेवढे महत्व वाढले. तो मिळवण्यासाठी आटापिटा सुरु झाला. अपमार्गाने पैसा कमवण्याची वृत्ती वाढली. घरातल्या माणसांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला झाली. इगो वाढला. गैरसमजापोटी घरे दुभंगली, चढाओढ वाढली, कुणाचा पायपोस कुणाला नाही. वितुष्ट वाढले, कोर्ट कचेरीचे चक्कर वाढले. ताणतणाव वाढले. आत्महत्यांचे प्रमाण वाढले. प्रत्येक जण भितीत, काळजीत जगतो. त्यामुळे नैसर्गिक आनंद, नैसर्गिक जगणंच आपण विसरत आहोत.

ज्येष्ठांसाठी खास एक तास हा कार्यक्रम राबवतो. कुणीही चिंतातुर राहू नये म्हणुन स्टेस् मॅनेजमेंट, तरुणांसाठी आर्ट ऑफ प्रेझेंटेशनअसे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. स्वच्छ मन स्वच्छ जीवन हे ब्रीद घेऊन प्रत्येकांच्या मनातील षड्रींपुंची घाण बाहेर काढायची. प्रत्येकाच्या मनांची स्वच्छता करण्यासाठी प्रयत्नशील असतात. मन स्वच्छ असलं की शरीर स्वच्छ राहते. आज जर हे झालं नाही तर पुढच्या दहा वर्षात शारीरीक व मानसिक आरोग्य धोक्यात येईल.आज जर आपले साधे साधे दिसणार्‍या गुणांना जोपासलं नाही तर पुढे माणसाला माणसापासुनच भिती व धोका राहील.

थोडा है थोडेकी जरुरत है या गीता प्रमाणे जे आहे त्याचा स्विकार करुन त्यातुनच थोडं सुधारणा करणं जरुरीचे आहे. म्हणून मग कुणाचा वाढदिवस, कुणाची एकषष्ठी सोहळा तर कुणाचा सहस्र् चंद्रदर्शन सोहळा साजरा करतात. खर्च सर्वजण आपसात वाटुन घेतात, बस्स एक समविचारी लोकांनी येऊन सुरु केलेल्या लहानशा यज्ञात जो तो आपल्या परीने समिधा टाकत असतात.

राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अभियान, अंधश्रध्दा निर्मुलन, शाळाबाह्य मुलांचे सर्वैक्षण, विविध वैद्यकीय शिबीरे यांचे आयोजन केलं जातं. ज्येष्ठांसाठी वनभोजन,स्नेहभोजन,सहली वा करमणुकीचे कार्यक्रम. विधी सेवा समितीच्या माध्यमाने प्रबोधन, कायदे विषयक माहीती व समुपदेशनची कामे करणे. दरवर्षी ऊन्हाळ्यात माणसांसाठी व गुराढोरांसाठीही पाणपोई लावणे, वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेऊन त्यांचे जोपासणा करणे ही कामेही केली जातात. अशा या विविध रंगी कामात रमणारी व दुसर्‍यांनाही रमवणारी ही आगळी वेगळी संस्था आहे.

पुरात वाहणार्‍याला वाचवण्यासाठी एकाद्याने त्या जीवाचा हात धरुन त्याला ओढण्याचा प्रयत्न करावा, त्याचा जीव वाचवण्यासाठी पराकाष्ठा करावी. अशावेळी, काठावर ऊभे राहून नुसती गंमत पाहण्यापेक्षा त्या हाताला हात द्यावा, साथ द्यावी तर जीव वाचतो अन्यथा तो वाहणारा आणि त्याला वाचवण्याचा एकाकी प्रयत्न करणाराही बिचारा वाहुन जातो. तसं होऊ नये, साथी हाथ बढाना, एक अकेला थक जायेगा, मीलकर बोझ ऊठाना, या गीतासारखं सर्वांच्या हातांची गरज असते.

खरं म्हणजे फाटक्या आभाळाला टाका टाकायचं हे काम आहे. पण आपल्या इवल्याशा चोचीत पाण्याचा थेंब घेऊन आग विझवायला निघालेल्या चिमणीची मानसिकता त्यांनी अंगीकारली आहे. हे कुणीतरी करायलं हवं, ते ही मंडळी करत आहे. सरणावर असा चढणार नाही चिमुटभर राखेत ऊरणार नाही जाता जाता आंसवे पुसुन हसवल्याशिवाय मरणार नाही

ही मनोकामना घेऊन युज अॅंड थ्रो च्या या जमान्यात प्रेम, माणुसकीची ज्योत तेवत राहावी ही सकारात्मकता अंगीकारण्यासाठी वेळोवेळी ही मंडळी तेल वात तपासत आहे. स्वार्थ, सत्ता, संपत्तीच्या पाठीमागे धावणार्‍या या जगात आपल्या थरथरणार्‍या हातांच्या सहाय्याने वादळ, वार्‍यापासून विझू पाहणार्‍या ह्या पणतीला तेवत ठेवण्यासाठी झटणार्‍या, धडपडणार्‍या या माणसांना म्हणुनच सलाम आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.