शौचायल खराब असल्याने विद्यार्थिनीने केली तक्रार, झाला प्रचंड छळ? तिने कॉलेजमध्येच केलं असं काही की…महाराष्ट्र हादरला!

Satara Crime News : साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थिनीने जीवन संपवल्याच्या प्रकरणी रेक्टर, प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचायल खराब असल्याने विद्यार्थिनीने केली तक्रार, झाला प्रचंड छळ? तिने कॉलेजमध्येच केलं असं काही की...महाराष्ट्र हादरला!
Satara Crime News
Image Credit source: Google
| Updated on: Sep 06, 2026 | 4:28 PM

सातारा शहरातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या लेडीज हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी हॉस्टेलच्या रेक्टर, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शौचालयातील गैरसोयींबाबत तक्रार केली म्हणून…

2 सप्टेंबर 2026 रोजी एका विद्यार्थीनीने आपले जीवन संपवले होते. हॉस्टेलमधील शौचालयातील गैरसोयींबाबत विद्यार्थिनीने तक्रार केली होती. तसेच या समस्येचा व्हिडिओ काढल्यामुळे तिच्यावर रेक्टर जयश्री जकाते आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिला मानसिक त्रास देण्यात आला तसेच महाविद्यालयातून काढून टाकण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

या मानसिक दबावाला कंटाळून विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश साळुंखे यांनीही योग्य वेळी लक्ष न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता रेक्टर जयश्री जकाते, प्राचार्य सुरेश साळुंखे आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन

काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून महाविद्यालयाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करण्यात आले होते. विद्यार्थिनीवर प्रशासन आणि हॉस्टेल कमिटीच्या दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली, असा गंभीर आरोप विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आला होता. या प्रकरणातील जबाबदार प्राचार्य आणि चौकशी समितीवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.

प्राचार्यांनी आरोप फेटाळले होते

विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर महाविद्यालयात रॅगिंग किंवा छळ झाल्याचे आरोप प्राचार्य सुरेश साळुंखे यांनी यापूर्वी फेटाळून लावले होते. पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता रेक्टर, प्राचार्य आणि हॉस्टेल कमिटीच्या सदस्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाली आहे. दरम्यान, सातारा शहर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, विद्यार्थिनीवर नेमका कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि तिच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us