सुधा मूर्ती भर मंचावर शाहू महाराज छत्रपती यांच्या पाया पडल्या, म्हणाल्या, ‘शिवाजी महाराज यांचे आपण पाया पडू शकत नाही, पण…’

सुधा मूर्ती यांनी खासदार शाहू महाराज छत्रपती यांना नमस्कार केला. हा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांना असल्याचं सुधा मूर्ती म्हणाल्या. शिवाजी महाराज यांच्या आपण पाया पडू शकत नाही. पण त्यांच्या वंशजांचं दर्शन घेत असल्याचं सुधा मूर्ती म्हणाल्या.

सुधा मूर्ती भर मंचावर शाहू महाराज छत्रपती यांच्या पाया पडल्या, म्हणाल्या, शिवाजी महाराज यांचे आपण पाया पडू शकत नाही, पण...
| Edited By: | Updated on: Aug 01, 2024 | 11:00 PM

राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सुधा मूर्ती यांनी पुरस्कार स्वीकारताना शाहू महाराज छत्रपती यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमात आणखी एक महत्त्वाचं म्हणजे सुधा मूर्ती यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. “मराठी आणि कानडी माझी आई आहे. कृष्णासारख्या मलाही दोन आई आहेत”, असं सुधा मूर्ती म्हणाल्या. “देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करताना मला मिळालेलं समाधान अवर्णनीय आहे”, अशीदेखील भावना सुधा मूर्ती यांनी व्यक्त केली.

सुधा मूर्तींकडून आपल्या भाषणात वाघनखांचा उल्लेख करण्यात आला. “मी लहानपणी नेहमी आईला विचारायचे की शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजल खान मारला ते कुठे आहेत? ⁠इंग्रज घेऊन गेले इतकच माहिती होतं. ⁠मी इंग्लडला गेले तेव्हा त्या म्युझीयममध्ये मी वाघनखे पाहिली तेव्हा मी पाया पडले. मी ⁠आज शाहू महाराजांच्या पाया पडणार आहे. ⁠कारण ते शिवाजी महाराजांचे वंशज आहेत”, असं म्हणत सुधा मूर्ती या शाहू महाराजांच्या पाया पडल्या.

शरद पवार काय म्हणाले?

यावेळी शरद पवार यांनी सुधा मूर्ती यांचं अभिनंदन केलं. “देशासाठी योगदान दिलेल्या अनेक मान्यवरांना हा पुरस्कार दिला आहे. सुधा मूर्ती यांना यंदाचा पुरस्कार दिला जातोय त्याचा मला आनंद आहे. देश स्वतंत्र होत असताना अनेकांनी कणखर भूमिका मांडली. त्यात लोकमान्य देखील होते. लोकमान्य टिळक यांची काळजी घेण्याची भूमिका तेव्हा शाहू महाराज यांनी घेतली होती. सुधा मूर्ती यांचं मनापासून अभिनंदन करतो. लोकांना हाताला काम देण्याचं काम इन्फोसिस करतं. ते काम नारायण मूर्ती यांनी केलं. त्यात साथ देण्याचं काम सुधा मूर्ती यांनी केलं. त्यांचं यातलं योगदान महत्त्वाचं आहे”, असं शरद पवार म्हणाले.