अजितदादा गेल्यापासून आपल्याला गृहित धरतायत, राष्ट्रवादीचा बडा नेता भर सभेत मनातलं बोलला
Satara Politics : अजितदादा गेल्यापासून आपल्याला गृहित धरत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्याने महायुतीवर केला आहे. या नेत्याच्या नाराजीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्रात पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा महायुतीत काही प्रमाणात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. निवडणुकीच्या सुरुवातीला महायुतीत उमेदवारीवरून मतभेद दिसून आले. आता उमेदवारांच्या प्रचारातही नाराजी दिसून येत आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्री मकरंद पाटील यांनी एका सभेत महायुतीविषयी मनातील खदखद व्यक्त केली. त्यांनी साताऱ्यातील आयोजित मेळाव्यात नाराजी व्यक्त केली. अजितदादा गेल्यापासून आपल्याला गृहीत धरताहेत, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
साताऱ्यात महायुतीत धूसफूस?
साताऱ्यात सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री मकरंद पाटील,खासदार नितीन पाटील आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सध्या पार पडत असलेल्या पदवीधर निवडणुकीबाबत ही बैठक बोलवण्यात आली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून साताऱ्यामध्ये महायुतीत सतत धुसफूस असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हाच धागा पकडून बैठकीला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दांडी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे सभागृहातील बऱ्याचशा खुर्च्या मोकळ्या असल्याचे देखील पाहायला मिळाले. ही गोष्ट मंत्री मकरंद पाटील यांच्या सुद्धा नजरेतून सुटली नाही. त्यांनी बैठकीत यावेळी बोलत असताना आज नेहमीसारखी उपस्थिती नसल्याचे बोलून दाखवली.
भर मेळाव्यातच मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून नाराजी
मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील उपस्थित असताना कार्यकर्त्यांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. त्यातच या मेळाव्यात बोलत असताना मकरंद पाटील यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेल्यापासून आपल्याला महायुतीत गृहीत धरले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. बैठकीदरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी घडलेल्या घटनेबाबत कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याचे पाहायला मिळाले.यामुळे मकरंद पाटील यांना महायुतीच्या उमेदवाराला अखेर मतदान करण्याची विनंती कार्यकर्त्यांना करावी लागली. मात्र कार्यकर्ते हे प्रचंड नाराज असून मकरंद पाटील यांच्या विनंतीला कार्यकर्ते किती मान देतात हे आता निकालानंतरच स्पष्ट होईल.
