लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं

लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसभेत मोठा पराभव, विधानसभेत गेम कसा फिरला? महायुतीच्या बड्या नेत्यानं सगळं सांगितलं
| Updated on: Jul 19, 2025 | 8:16 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं होतं. महायुतीमधील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पूर्ण बहुमतानं आलं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभा निवडणुकीत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला आणि महायुतीलाही मोठ्या पराभवाला समोरं जावं लागलं. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही पुनरागमन केलं. जनतेमध्ये जाऊन आम्ही लाडकी बहीण योजनेची घोषणा केली, या योजनेची प्रखरतेने अंमलबजावणी केली, शेतकऱ्यांना 1400 कोटी रुपयांची वीजबिल माफी दिली, त्यानंतर शेतकऱ्यांचं वीजबिल शून्यावर पोहोचलं. लोकांना आम्ही पायाभूत सुविधांचं अभिवचन दिलं, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला विजय प्राप्त करून दिला, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून अभिमानपूर्वक सांगतो, विधानसभेत 59 जागेवरती घड्याळाच्या चिन्हावर आम्ही लढलो आणि 41 जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश आम्हाला मिळालं. सरकार स्थापन झाले सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, आठ ते नऊ वर्षानंतर मनपा नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत.

या काळात मोठ-मोठ्या पक्षांमध्ये प्रदीर्घकाळ पदावर राहिलेले, अनेक पदाधिकारी चांद्यापासून ते बांद्यापर्यंत, विदर्भापासून ते कोकणापर्यंत सर्वच भागांमध्ये पक्षाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. ही जमेची बाजू आहे. तर दुसऱ्या बाजुला संघटन वाढवून संघटनेत शिस्त आणणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रमुखांचे मनोगत ऐकून घेणे हाच सर्वांचा हेतू आहे,  उत्तर महाराष्ट्र जळगाव ,नंदुरबार ,धुळे ,नाशिक काल संभाजीनगर ,जालना आणि आज हिंगोली संध्याकाळी परभणी असा हा दौरा आहे , असं तटकरे यांनी म्हटलं आहे.