मतमोजणी केंद्रासमोरच लिंबू-अगरबत्ती; मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं. त्यानंतर आज (सोमवार) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मात्र मतमोजणीपूर्वीच केंद्रासमोरील खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

मतमोजणी केंद्रासमोरच लिंबू-अगरबत्ती; मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीत अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस
मतमोजणी केंद्रासमोर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 08, 2026 | 9:40 AM

कोल्हापुरात मजमोजणी केंद्रावर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे. चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावरील हा प्रकार आहे. मतमोजणी केंद्रावरील खुर्चीवर लिंबू, अंगारा आणि अगरबत्ती ठेवल्याचं समोर आलं आहे. जवळपास दशकभरानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीवरून मोठा वाद झाल्याचंही पहायला मिळालं होतं. त्यातच कलाकार, दिग्दर्शक, निर्माते यांनी महामंडळाच्या मतदानाकडे पाठ फिरवली आहे. या निवडणुकीत जवळपास 49.90 टक्के इतकं अल्प प्रमाणात मतदान झालं. आज (सोमवार) मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्राबाहेरील खुर्चीवर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आला आहे.

चित्रपट महामंडळाच्या 17 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित 14 जागांसाठी 44 उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. मावळते अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल, सतीश रणदिवे यांच्या नेतृत्वाखालील चित्रकर्मी पॅनल आणि 16 अपक्ष उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रविवारी मुंबई, पुणे आणि कोल्हापूर याठिकाणी मतदान झालं. कोल्हापूर केंद्रावर 746 पैकी 517 मतदारांनी मतदान केलं. टक्केवारीनुसार राज्यात कोल्हापूरचं मतदान चांगलं झालं. तर पुण्यात 724 पैकी 460 मतदारांनी मतदान केलं. दरम्यान आज राम गणेश गडकरी सभागृह इथं मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.

बिनविरोध उमेदवार कोणते?

  • वर्षा उसगावकर- अभिनेत्री
  • विजय खोचीकर- संकलन
  • आनंद शिंदे- संगीत पार्श्वगायन

चित्रपट महामंडळाची ही निवडणूक त्यातील राजकारणामुळे विशेष चर्चेत आली. एकीकडे राजकारण करून काही लोकांनी माझा उमेदवारी अर्ज भरू दिला नाही, असा आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला. तर दुसरीकडे नीलम शिर्के यांच्या उमेदवारीवरून प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अखेर वर्षा उसगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने माघार घेते, असं पत्रक अभिनेत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्केंनी काढलं.

विजय पाटकर यांनी निवडणुकीत मंत्र्यांच्या हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित केला होता. “एका मंत्र्यांचा ओएसडी मागच्या चार दिवसापासून कोल्हापुरात आहे आणि तो लोकांवर दबाव आणत आहे. त्यांच्या वतीने हा व्यक्ती नको तो व्यक्ती नको असं सांगितलं जात आहे. मला कळत नाही त्या मंत्र्यांची आणि ओएसडी यांची विधानभवनातील सगळी कामं संपली आहेत का? जेणेकरून ते चित्रपट महामंडळात ठाण मांडून बसले आहेत. मागील 40 वर्षे आम्ही इंडरस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं,” असा संतप्त सवाल पाटकर यांनी केला होता.

Follow Us