
मुंबईतील जनतेसाठी एक खुशखबर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी तानसा तलाव आज (23 जुलै 2025) भरुन ओसंडून वाहू आगला. आज सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे’ 3 दरवाजे दिनांक 7 जुलै 2025 रोजी उघडण्यात आले. तर, दिनांक 9 जुलै 2025 रोजी मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आज तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे.
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या 86.88 टक्के इतका जलसाठा आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण असून हे सर्वात जुन्या दगडी बांधांपैकी एक मानले जाते. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 14,508 कोटी लीटर (145,080 दशलक्ष लीटर) एवढी आहे.
तानसा तलाव गतवर्षी दिनांक 24 जुलै 2024 रोजी पहाटे 4.16 वाजता, दिनांक 26 जुलै 2023 रोजी पहाटे 4.35 वाजता, तर वर्ष 2022 मध्ये दिनांक 14 जुलै रोजी रात्री 8.50 वाजता आणि सन 2021 मध्ये दिनांक 22 जुलै रोजी पहाटे05.48 वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.05 वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.