राज्याच्या राजकाणात पुढच्या 48 तासांत भूकंप, काँग्रेसचा शरद पवारांच्या पक्षाला थेट अल्टिमेटम; काहीतरी मोठं घडणार?

महाविकास आघाडीत मोठी बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

राज्याच्या राजकाणात पुढच्या 48 तासांत भूकंप, काँग्रेसचा शरद पवारांच्या पक्षाला थेट अल्टिमेटम; काहीतरी मोठं घडणार?
thane ncp and congress
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 24, 2025 | 8:08 PM

Thane Municipal Corporation Election : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. युती आणि आघाडी करताना जास्तीत जास्त जागा आपल्याच वाट्याला कशा येतील, यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड चालू आहे. असे असतानाच आता ठाणे जिल्ह्यात महाविकास आघाडीत वादाची मोठी ठिणगी पडली आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजीत पवार यांनी केलेल्या एका कृतीमुळे तिथे काँग्रेस पक्षाने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने येथे शरद पवार यांच्या पक्षाला 48 तासांचा अल्टिमेटमट दिला आहे. काँग्रेसला जागांचा प्रस्ताव न आल्यास आम्ही काहीतरी मोठा निर्णय घेऊ, असा थेट इशाराच काँग्रेसने येथे शरद पवार यांच्या पक्षाला दिला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यात महाविकास आघाडीमध्ये अद्याप अधिकृत जागावाटप झालेले नाही. असे असताना कळवा प्रभाग क्रमांक नऊमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष अभिजित पवार यांनी पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत मोठी रॅली काढली. तसेच या रॅलीनंतर परस्पर उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिजित पवार यांच्या याच कृत्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. राष्ट्रवादीचे हे वर्तन आघाडीच्या भवितव्यासाठी पोषक नसून आघाडीत बिघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला वर्तनात सुधारणा करावी, असा इशाराच ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. तसेच ४८ तासांच्या आता आघाडीचा प्रस्ताव न आल्यास आम्ही वेगळा विचार करू, असेही चव्हाण यांनी सांगितले.

जागावाटप झालेले नाही तरी…

ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणुक जाहीर झाली असून ३३ प्रभागांमध्ये काँग्रेसकडे १३१ उमेदवार आहेत. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस हाच एकमेव राष्ट्रीय पक्ष असल्याने महायुतीच्या विरोधात कडवी लढत देण्यासाठी हा पक्ष सज्ज आहे. जागावाटपात काँग्रेसने ३५ जागांचा प्रस्ताव दिलेला आहे. मात्र आघाडीचे जागावाटप झालेले नाही, किंवा त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणाही झालेली नाही. असे असताना आघाडीतील सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस परस्पर आपला उमेदवार जाहीर करते हे आघाडीच्या भवितव्याला पोषक नाही, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली

तसेच. आघाडीतील पक्षाने स्वतःच्या पक्षाचा उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केली असती तर चालले असते, अद्याप पक्षाकडून एबी फॉर्म दिलेला नाही. तरी अशा प्रकारे अभिजीत पवार यांनी स्वतःला मविआ आघाडीचा उमेदवार घोषित करून जाहिर रॅली काढणे कितपत योग्य आहे? असा सवालही चव्हाण यांन केला. राष्ट्रवादीच्या या आगळीकीमुळे काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कळव्यात राष्ट्रवादी काँग्रेस रिकामी झाली आहे. मुंब्यात राष्ट्रवादीची बी टीम महायुतीसाठी काम करीत आहे, कळव्यात आमच्याकडे चार चार उमेदवार तयार असून तेवढे मतदारही आहेत. त्यामुळे काँग्रेस कुणाच्या मागे फरफटत जाणार नाही, असे ठणकावत विक्रांत चव्हाण यांनी ४८ तासात राष्ट्रवादीने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा, यांची संस्थाने खालसा व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा दिला. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.