गावसकर-तेंडुलकरची शतकं ते पवार-ठाकरेंची भाषणं, ठाण्यातील मूक साक्षीदाराची पन्नाशी

ग्राउंड रोलरने टेनिस क्रिकेटची पंढरी असलेल्या वर्तकनगरच्या मैदानाची नेहमीच निगा राखली. (Thane Vartaknagar Ground Roller)

गावसकर-तेंडुलकरची शतकं ते पवार-ठाकरेंची भाषणं, ठाण्यातील मूक साक्षीदाराची पन्नाशी


ठाणे : सचिन तेंडुलकर-सुनील गावसकर यांची शतकी खेळी ते शरद पवार- बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा तो मूक साक्षीदार राहिला. फुलांची सजावट, कस्टमाईज केक आणि जोडीला चविष्ट नाश्ता… ही सर्व तयारी एखाद्या तरुणाच्या वाढदिवसाची नसून वर्तकनगर येथील ‘झेडपी’च्या मैदानाची गेल्या पन्नास वर्षांपासून निगा राखणाऱ्या ‘ग्राउंड रोलर’च्या सन्मान सोहळ्याची होती. रविवार असूनही लाडक्या क्रिकेट रत्नाला अनोखी मानवंदना देण्यासाठी वर्तकनगरात आजी माजी खेळाडूंच्या आठवणींचा डाव या ठिकाणी रंगला. ग्राऊंड रोलरचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस जल्लोषात साजरा करताना आयुष्यातील अनेक भागीदारीचा किस्सा येथील खेळाडूंनी मांडला. (Thane Vartaknagar Ground Roller celebrates 50th Birthday)

वर्तकनगरच्या मैदानाची निगा राखणारा ग्राउंड रोलर

वर्तकनगरमधील सिनियर खेळाडूंच्या वतीने या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 21 फेब्रुवारी 1971 रोजी हा ग्राउंड रोलर मैदानात आणण्यात आला. त्याला 50 वर्षे पूर्ण झाली. हा रोलर जागचा हलवण्यासाठी सात आठ जणांची टीम लागते. गोलाकार लोखंडी आणि आतमध्ये सिमेंट काँक्रेट ठासून भरलेल्या या ग्राउंड रोलरने टेनिस क्रिकेटची पंढरी असलेल्या वर्तकनगरच्या मैदानाची नेहमीच निगा राखली.

याच मैदानात सुनील गावस्कर, कार्सन घावरी, सलीम दुराणी, सचिन तेंडुलकर, इकबाल खान, रशीद पटेल या खेळाडूंचा खेळ ग्राउंड रोलरने पाहिला. तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा देखील या रोलरने ऐकल्या आहेत. विशेष म्हणजे, जागतिक विक्रम नोंदवणाऱ्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी सोहळ्याचा देखील हा रोलर साक्षीदार आहे.

झेडपीच्या मैदानात प्रथमच ग्राउंड रोलरचा सन्मान

वर्तकनगर म्हाडा वसाहतीला जवळपास साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मैदानातून अनेक खेळाडू, डॉक्टर, इंजिनियर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, राजकारणी खेळून तयार झालेत. क्रिकेटमध्ये खेळाडूचा, प्रशिक्षकाचा, पंचाचा, ग्राउंडमनचा नेहमीच सन्मान केला जातो. मात्र वर्तकनगर येथील झेडपीच्या मैदानात प्रथमच ग्राउंड रोलरचा अनोखा सन्मान त्याच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आला. (Thane Vartaknagar Ground Roller celebrates 50th Birthday)

यावेळी ज्येष्ठ खेळाडू दाजी भगत, अजित म्हात्रे, श्रीकांत म्हात्रे, मनोहर मोरजकर, बबन राणे, भाई सावंत, नितीन सिंघेवर आदी उपस्थित होते. तर अजित इलेव्हन संघाचे संस्थापक अजित म्हात्रे यांनी केक कापून या सोहळ्याची सांगता केली. सुशिल सुर्वे, अभय अमृतकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या मैदानावर खेळलेले स्थानिक नगरसेवक विक्रांत चव्हाणही सोहळ्याला हजर होते.


संबंधित बातम्या :

इंदापुरात येऊन जेव्हा अझरुद्दीन म्हणतात… ‘मी पुन्हा येईन’

राशिद खानच्या हेलिकॉप्टर शॉटवर सारा फिदा, म्हणते ‘असा शॉट मला पण शिकव!’

(Thane Vartaknagar Ground Roller celebrates 50th Birthday)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI