गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा दुभाजकाला धडकली, मग जे घडले ते पाहून अंगावर काटा येईल !

| Updated on: May 03, 2023 | 10:38 PM

लोकमान्य नगरहून एक महिला रिक्षाने घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने येत होती. मात्र इच्छित स्थळी पोहचण्याआधीच वाटेतच महिलेचा घात झाला.

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा दुभाजकाला धडकली, मग जे घडले ते पाहून अंगावर काटा येईल !
घोडबंदर रोडवर बर्निंग रिक्षाचा थरार
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना आज सकाळी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख भागात घडली. दुभाजकाला धडकल्यानंतर अचानक रिक्षाने पेट घेतल्याने लागलेल्या आगीत प्रवासी महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर रिक्षाचालक जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राजेशकुमार यादव असे जखमी रिक्षाचालकाचे नाव आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. याप्रकरणी कासारवडवली पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले.

रिक्षाने पेट घेताच चालक बाहेर पडला तर महिला होरपळली

ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नं. 4 येथे राहणारा रिक्षाचालक राजेशकुमार यादव हा एका महिला प्रवाशाला घेऊन घोडबंदर रोडवरून ठाण्याच्या दिशेने येत होता. सकाळी पावणे सहाच्या सुमारास रिक्षा गायमुख पोलीस चौकीजवळ आली असता यादव याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा दुभाजकाला धडकली. त्यानंतर रिक्षाने अचानक पेट घेतल्याने रिक्षाचालक यादव रिक्षाबाहेर पडला. मात्र आगीत होरपळून महिला प्रवासी ठार झाली. या मृत महिलेची अद्याप ओळख पटली नाही. दरम्यान, रिक्षामध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्याने या दुर्घटनेबाबत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावर द बर्निंग कारचा थरार

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी ते दर्यापूर मार्गावर दर्यापूरकडून अंजनगावकडे येणाऱ्या बलेनो कंपनीच्या कारला अचानक आग लागली. गाडीत बसलेल्या गाडीचे मालक पुरुषोत्तम दातीर आणि त्यांचा भाचा हिमांशू भावे यांच्या लक्षात येताच त्यांनी चिंचोली फाट्यावर कार थांबवली. अग्निशामक दलाचे वाहन येईपर्यंत बलेनो कार जळून खाक झाली होती. वाहनातील दोघांच्या सतर्कमुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हे सुद्धा वाचा