केडीएमसी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली.

केडीएमसी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, काँग्रेस जिल्हाध्यक्षांची माहिती

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे आदेश नाना पाटोले यांनी कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच त्यादृष्टीने तयारी करण्याच्या सूचना दिल्या.

काँग्रेसच्या 12 मंत्र्यांच्या कल्याण डोंबिवलीत जनता दरबार

आगामी काळात काँग्रेसचे 12 मंत्री कल्याण डोंबिवलीत जनता दरबार घेणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली आहे. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीला पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी दिली.

काँग्रेसचे महापालिका आयुक्तांना निवेदन

कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने काँग्रेस स्वबळावर लढण्याची भाषा करताना दिसून येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध नागरी प्रश्नावर महापालिका मुख्यालयात आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी यावेळी पत्रकारांसोबत बोलताना काँग्रेस महापालिका निवडणुक स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी बरोबर आघाडीत असलेली काँग्रेस येथे स्वबळावर लढण्याची भाषा करीत आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत 122 नगरसेवक असलेल्या महापालिकेत कॉंग्रेसचे फक्त 4 नगरसेवक निवडून आले होते.

काँग्रेसच्या शिष्टमंडळातील ‘या’ नेत्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिलं

महापालिकेत एवढेच नाही तर हा महाविकास आघाडी सरकारमधील 12 मंत्री कल्याण-डोंबिवलीत जनता दरबार घेणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे. आयुक्तांना नागरी प्रश्नावर निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात प्रदेश सचिव संतोष केणे, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे, माजी नगरसेवक रवी पाटील, कल्याण पूर्व अध्यक्ष शकील शेख आदी बरोबर अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा, रस्त्याची दुरवस्था, अपुरा पाणी पुरवठा, घन कचरा व्यवस्थापन कर, वाहतूक कोंडी, बी.एस.यु.पी घरे, कचोरे येथील मुस्लीम समाजासाठी दफनभूमी, स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असलेले प्रकल्प तसेच शहरातील वाढते प्रदूषण याबाबत निवेदन देण्यात आले.

हेही वाचा : अनिल परब यांच्या विरोधात भाजप आक्रमक; प्रताप सरनाईकांना विचारताच म्हणाले, मी स्वत:च अडचणीत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI