बोटिंगसाठी पर्यटकांची गर्दी, सुरक्षेचे नियम किती पाळले जातात?, आयुक्तांनी दिला हा इशारा

| Updated on: May 25, 2023 | 8:21 PM

पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या जीवाशी खेळ कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बोटिंगसाठी पर्यटकांची गर्दी, सुरक्षेचे नियम किती पाळले जातात?, आयुक्तांनी दिला हा इशारा
Follow us on

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : उन्हाचे दिवस असल्याने पाणी बहुतेकांना हवेहवेसे वाटते. त्यामुळे बोटिंगसाठी बरेच पर्यटक येतात. पण, बोटिंग करत असताना त्यांना सुरक्षा जॅकेट पुरवले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पर्यटकांच्या जीवाशी खेळ कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तलावांचे शहर म्हणून ओळख आलेल्या ठाणे शहरातील मासुंदा, उपवन, आंबे-घोसाळे आणि खारीगाव या तलावांवर महापालिकेच्यावतीने बोटींग सुविधा उपलब्ध आहे. सध्या सुट्ट्यांमुळे बोटिंगला गर्दी होताना दिसत आहे.

लहान मुलांना शाळेला लागलेल्या सुट्ट्या आणि मुलांच्या विरंगुळ्यासाठी पालक आपल्या पाल्यांना पर्यटक स्थळ म्हणून बोटिंग करताना घेऊन जाताना पाहायला मिळतात. या पर्यटकांना आवश्यक ती काळजी घेऊन सुरक्षेची साधने उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे.

हे सुद्धा वाचा

मर्यादेपेक्षा जास्त पर्यटक

अपघात होऊनही दुर्देवी घटना घडणार नाही, हा त्यामागचा उद्देश आहे. मात्र बोटिंग सुविधेच्या ठेकेदाराकडे सुरक्षा साहित्य उपलब्ध असताना देखील ते वापरले जात नाही. किंबहुना मर्यादेपेक्षा जास्त पर्यटकांची संख्या बोटिंगसाठी घेतली जाते. अशा तक्रारी आल्यानंतर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने दखल घेतली.

ठेकेदाराकडून केराची टोपली

बोटिंगदरम्यान सुरक्षा जॅकेट आणि नियमांचे पालन न केल्यास संबंधित विभाग तसेच ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र या आदेशाला ठेकेदारांकडून केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात आहे.

आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी ठेकेदार हे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लागणारे लाईफ जॅकेटची पूर्तता करताना दिसून येत नाही. अनेक लहान मुले आणि वयोवृध्द हे बोटीतून बिना सुरक्षेच्या प्रवास करताना दिसून येत आहे. ठेकेदारांमध्ये आयुक्तांची भीती उरलीच नाही का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.