Ambernath Dumping Ground : अंबरनाथचे चिखलोली डम्पिंग दुसरीकडे हलवणार ? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी

| Updated on: Jul 27, 2022 | 12:15 AM

आता पावसाळा सुरू झाल्यानंतर कचऱ्याचं पाणी जमिनीत झिरपून थेट इमारतींच्या बोअरवेलमध्ये सुद्धा हे घाण पाणी येऊ लागलंय. त्यामुळं या भागात मोठी रोगराई पसरू लागली असून नागरिक पुरते हैराण झाले आहेत.

Ambernath Dumping Ground : अंबरनाथचे चिखलोली डम्पिंग दुसरीकडे हलवणार ? केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी
अंबरनाथ डम्पिंग ग्राऊंड
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथच्या चिखलोली (Chikhaloli) परिसरात नव्यानं उभारण्यात आलेल्या डम्पिंग ग्राऊंड (Dumping Ground)चा नागरिकांना मोठा त्रास होत असून नागरिकांच्या तक्रारीवरून मंगळवारी राष्ट्रीय हरित लवादा (National Green Arbitration)च्या अधिकाऱ्यांनी या डम्पिंगची पाहणी केली. यावेळी केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रांत अधिकारी आणि अंबरनाथ नगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. चिखलोली परिसरात गेल्या काही वर्षात झपाट्यानं नागरीकरण झालं आहे. मुंबई, ठाण्याहून कष्टकरी वर्गानं लाखो रुपयांची कर्ज काढून या भागात घरं घेतली आहेत. मात्र केवळ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे त्यांच्या नशिबी घाणीत राहणं आलं असून यावर तोडगा न निघाल्यास रहिवाशांच्या भावनांचा उद्रेक होईल, असा इशारा रहिवाशांनी दिलाय. त्यामुळं आता हे डम्पिंग स्थलांतरित होतं का? हे पाहावं लागणार आहे.

डम्पिंगमुळे परिसरात रोगराई पसरतेय

अंबरनाथच्या मोरीवली पाड्यातील अनधिकृत डम्पिंग ग्राऊंडसमोर न्यायालयाची इमारत आल्यानं हे डम्पिंग वर्षभरापूर्वी चिखलोली परिसरातील सर्व्हे क्रमांक 132 या भूखंडावर स्थलांतरित करण्यात आलं. मात्र या डम्पिंगला अगदी लागूनच रहिवासी इमारती असल्यानं रहिवाशांना दुर्गंधीचा मोठा त्रास होऊ लागला. त्यावेळी हे डम्पिंग तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी सुरू करण्यात आलं असून लवकरच दुसऱ्या ठिकाणी पालिकेचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार असल्याचं पालिकेनं रहिवाशांना सांगितलं होतं. मात्र 3 महिने, 6 महिने अशी आश्वासनं देत आज वर्ष उलटूनही हे डम्पिंग याच ठिकाणी सुरू आहे. त्यातच आता पावसाळा सुरू झाल्यानंतर कचऱ्याचं पाणी जमिनीत झिरपून थेट इमारतींच्या बोअरवेलमध्ये सुद्धा हे घाण पाणी येऊ लागलंय. त्यामुळं या भागात मोठी रोगराई पसरू लागली असून नागरिक पुरते हैराण झाले आहेत. तर हेच पाणी आसपासच्या शेतांमध्येही घुसलं असून त्यामुळे अनेक एकर शेतीची अक्षरशः नासाडी झाली आहे.

पालिका दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांची हरित लवादाकडे तक्रार

याच त्रासाविरोधात अंबरनाथ पालिकेकडे अनेकदा दाद मागूनही काहीही फरक पडत नसल्यानं नागरिकांनी थेट राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत तक्रार केली. यानंतर राष्ट्रीय हरित लवाद, केंद्रीय आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अधिकाऱ्यांनी आज या डम्पिंग ग्राऊंड आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रांत अधिकारी जयराज कारभारी, अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. नागरिकांशी चर्चा करून आणि प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाला पाठवण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्याकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं यावेळी प्रांत अधिकारी जयराज कारभारी यांनी सांगितलं. (Inspection of Ambernaths Chikhloli dumping by National Green Arbitration and Maharashtra Pollution Control Board)

हे सुद्धा वाचा