शाहू महाराजांचा इतिहास जितेंद्र आव्हाड दाखवणार, नव्या सिनेमाची घोषणा; कधी होणार सिनेमा रिलीज?

| Updated on: Dec 01, 2022 | 4:54 PM

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असा कोणताही चुकीचा प्रकार आम्हाला दाखवायचा नाही. एनसीपीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे विधान केले जात आहे.

शाहू महाराजांचा इतिहास जितेंद्र आव्हाड दाखवणार, नव्या सिनेमाची घोषणा; कधी होणार सिनेमा रिलीज?
शाहू महाराजांचा इतिहास जितेंद्र आव्हाड दाखवणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे : सिनेमातून इतिहासाचं विकृतीकरण होत असल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड अस्वस्थ आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड राजर्षि शाहू महाराज यांच्यावर सिनेमा काढणार आहे. या सिनेमातून शाहू महाराजांचा खरा इतिहास दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षीच प्रदर्शित होणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं. शाहू महाराज यांच्यासह ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांचाही इतिहास या सिनेमातून दाखवणार असल्याचं आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

सध्या सुरु असलेल्या इतिहासाच्या विकृतीवरून आता खरा इतिहास चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. पुढच्या वर्षात शाहू महाराजांवरील हा चित्रपट नागरिकांच्या भेटीला येणार आहे. एकूण 8 भाषांमध्ये हा सिनेमा असणार आहे. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही न दाखवता योग्य इतिहास दाखवणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जातपात, धर्म कोणत्या पॅरामिटरमध्ये मोजले जातात हेच कळत नाही. 2003 पासून शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्य विधान करण्यास सुरूवात झाली. जेम्स लेनने याची सुरुवात केली आणि यावरती सर्वात आधी मी आक्षेप घेतला. जेम्स लेनला ज्यांनी माहिती दिली, त्यांची जाऊन या लोकांनी माफी मागितली. त्याचवेळी जातीपातीचं राजकारण सुरू झालं. होय त्यांनीच जातीपातीचं राजकारण सुरू केलं, अशी टीका त्यांनी केली.

ब.म. पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला. तेव्हा तुम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. तेव्हा जातीपातीचे राजकारण तुम्हाला दिसलं नाही का? हर हर महादेव चित्रपटात देखील तसंच दाखवण्यात आलं होतं. या चित्रपटाला तुम्हीच पाठिंबा दिला होता. त्याला आवाज देखील तुम्हीच दिला ते कसं चाललं, असा सवाल त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता केला.

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असा कोणताही चुकीचा प्रकार आम्हाला दाखवायचा नाही. एनसीपीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे विधान केले जात आहे. पूर्वीच्या काळातील लोक इतिहास कसा वाचतील? कारण तेव्हा समाजातील मुलांना शाळेत बसून देत नव्हते. समाजातील ही दुसरी पिढी शिकत आहे. आम्हाला साधी अक्षर ओळख नव्हती, असंही त्यांनी सांगितलं.

फुले, शाहू, आंबेडकर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे चालणारे हे महापुरुष आहेत. जेव्हा ते जातीय बोलतात तेव्हा जातीपातीचे राजकारण राजकारण नसतं. महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना वेगळी ओळख द्यायला नको. तुम्ही वेगळी ओळख द्यायला जाता आणि त्यात राजकारण करता, अशी टीकाही त्यांनी केली.