अंत्यसंस्कार करताना शवदाहिनीतील गॅस संपला, मृतदेह तीन दिवस पडून, भाईंदरमधील प्रकार

| Updated on: Sep 09, 2021 | 7:37 AM

गॅसचा पुरवठा करणारे सिलेंडर रिकामे झाले असल्यामुळे त्या दिवशी पूर्ण अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. परिणामी मृतदेह अर्धवट अंत्यसंस्कार झालेल्या स्थितीत तीन दिवस गॅस शवदाहिनीमध्येच पडून होता, अशी धक्कादायक बाब समोर आली.

अंत्यसंस्कार करताना शवदाहिनीतील गॅस संपला, मृतदेह तीन दिवस पडून, भाईंदरमधील प्रकार
मीरा भाईंदरमध्ये शवदाहिनीतील गॅस संपल्याने मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार
Follow us on

भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीतील गॅस शवदाहिनीमधील गॅस अचानक संपुष्टात आल्याने मृतदेहावर अर्धवट अंत्यसंस्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल तीन दिवसांनी गॅस भरण्यात आल्यानंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले. मात्र तोपर्यंत पार्थिव तिथेच पडून राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीमध्ये शनिवारी रात्री एका मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आला होता. नातेवाईकांना गॅस शवदाहिनीवर अंत्यसंस्कार करायचे असल्याने मृतदेह गॅस शवदाहिनीत ठेवण्यात आला. शवदाहिनीचे यंत्र सुरु असताना ते अचानक बंद पडले, त्यावेळी गॅस पुरवठा बंद झाला असल्याचे कर्मचार्‍याच्या लक्षात आले.

नेमकं काय घडलं?

गॅसचा पुरवठा करणारे सिलेंडर रिकामे झाले असल्यामुळे त्या दिवशी पूर्ण अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. परिणामी मृतदेह अर्धवट अंत्यसंस्कार झालेल्या स्थितीत तीन दिवस गॅस शवदाहिनीमध्येच पडून होता, अशी धक्कादायक बाब समोर आली. अखेर तीन दिवसांनी सिलेंडरमध्ये गॅस रिफिल केल्यानंतर बुधवारी रात्री शवदाहिनी सुरु करुन अंत्यसंस्कार पूर्ण करण्यात आले. या घटनेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आला आहे.

कारवाईचं आश्वासन

दरम्यान, गॅस शवदाहिनीचा कोरोना काळ वगळता फारसा उपयोग होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचे नातेवाईक शवदाहिनी ऐवजी लाकडावरच अंत्यसंस्कार करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शवदाहिनीवर होत असलेला लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे. आता या घटनेची चौकशी करुन जबाबदार व्यक्तीवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे, असे आश्वासन मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या  अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

जळत्या चितेवर स्लॅब कोसळला

दुसरीकडे, यवतमाळ जिल्ह्यात महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी चक्क सिमेंट काँक्रीटचे शेड अचानक जळत्या चितेवर कोसळल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. यामुळे चितेवरील पार्थिव त्याखाली दबले जाऊन अर्धवटच जळाले होते. पुसद तालुक्यातील निंबी येथे ही घटना घडली होती. पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर काही क्षणातच नकळत मोठा आवाज झाला. त्याचवेळी सिमेंट काँक्रीटच्या शेडचा बांधलेला स्लॅब अचानक कोसळला. त्याखाली पार्थिव आणि सरण पूर्णपणे दबले गेले. अचानक घडलेल्या या घटनेने सर्व जण अवाक् झाले होते. सरणाजवळ जमलेली मंडळी बाजूला सरकल्याने प्राणहानी टळली होती. सिमेंट काँक्रीटच्या स्लॅबखाली दबलेल्या पार्थिव आणि सरणाला बाहेर कसे काढावे? असा मोठा प्रश्न अंत्यसंस्काराला जमलेल्या नागरिकांना पडला होता.

संबंधित बातम्या :

मरणानेही छळले, स्मशानात जळत्या चितेवर सिमेंट काँक्रीटचा स्लॅब पडला, पार्थिव दबले गेले