‘तो माझ्या कपाळावर हात फिरवून सांगत होता…’, महेश गायकवाड यांनी सांगितला रुग्णालयातला अनुभव

| Updated on: Feb 26, 2024 | 8:12 PM

"आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माझे सहकारी मित्र शाम शिंदे आणि मुकेश हे मला रोज विचारायचे, तुला सहा गोळ्या लागल्या, असं काय मॅजिक झालं, तुला देव दिसला का? मी त्यांना सांगितलं हो", अशा भावना महेश गायकवाड यांनी व्यक्त केल्या.

तो माझ्या कपाळावर हात फिरवून सांगत होता..., महेश गायकवाड यांनी सांगितला रुग्णालयातला अनुभव
Follow us on

गणेश थोरात आणि सुनील जाधव, Tv9 प्रतिनिधी, कल्याण | 26 फेब्रुवारी 2024 : शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांना तब्बल 24 दिवसांनंतर आज रुग्णालयात डिस्चार्ड मिळाला आहे. महेश गायकवाड यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी भर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाले होते. महेश गायकवाड यांना तब्बल 6 गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करुन शरीरातील 6 गोळ्या काढण्यात आल्या होत्या. जवळपास आठ दिवस महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर त्यांची प्रकृती आता ठीक झाली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी प्रथम टेंभी नाका येथे जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांची विचारपूस केली असता,आनंद दीघे हे माझे प्रेरणास्थान आहे, असं महेश गायकवाड म्हणाले. या व्यतिरिक्त महेश गायकवाड इतर विषयांवर काही बोलले नाहीत. त्यांची इतर विषयांवर बोलण्यास मनस्थिती दिसून आली नाही. त्यांच्या चेहऱ्यावरदेखील अस्वस्थपणा दिसून येत होता. यानंतर ते आज कल्याणमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये जागोजागी फटाके फोडून जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी महेश गायकवाड यांचं जंगी स्वागत केलं. तसेच महेश गायकवाड त्यांच्या कार्यालयाजवळ आले तेव्हा कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी महेश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना भूमिका मांडली.

महेश गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया काय?

“आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माझे सहकारी मित्र शाम शिंदे आणि मुकेश हे मला रोज विचारायचे, तुला सहा गोळ्या लागल्या, असं काय मॅजिक झालं, तुला देव दिसला का? मी त्यांना सांगितलं हो. मला जेव्हा घाव झाले तेव्हा त्याला त्रास होत होता. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. तो माझ्या कपाळावर हात फिरवून मला सांगत होता, काळजी करु नको मी आलोय. मी बोललो, साहेब तुम्ही आल्यामुळे माझ्यात एनर्जी आली. ती व्यक्ती होती डॉ. श्रीकांत शिंदे. मला त्यावेळी कळालं की जेव्हा एका कार्यकर्त्यावर अशाप्रकारचं संकट येतं तेव्हा आपला नेता आपल्याजवळ असणं किती गरजेचं आहे त्यावेळेस मला जाणवलं”, असं महेश गायकवाड म्हणाले. महेश गायकवाड यांचा मनातला भाव यावेळी बरंच काही बोलू पाहत होता.

गणपत गायकवाडांवर कठोर कारवाई व्हावी, महेश गायकवाड यांच्या पत्नीची मागणी

दरम्यान, महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या पत्नी सारिका गायकवाड यादेखील आल्या होत्या. त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “गणपत गायकवाड यांनी असं करायला नको होतं. त्यांनी खूप वाईट केलं. गणपत गायकवाड यांच्यावर खूप मोठी कारवाई केली पाहिजे जेणेकरुन पुन्हा अशी हिंमत कुणी करणार नाही”, अशी प्रतिक्रिया महेश गायकवाड यांच्या पत्नी सारिका गायकवाड यांनी दिली.