मुंब्रा लोकल अपघातानंतर मनसे ॲक्शन मोडवर; ठाण्यात धडक मोर्चा
सोमवारी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातानंतर मनसेनं आज सकाळी ठाण्यात धडक मोर्चा काढला आहे. यावेळी अविनाश जाधव यांनी रेल्वे स्थानकारवर अनेक सुविधांचा अभाव असल्याची गोष्ट निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) धडक मोर्चा काढण्यात आला. गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानकापर्यंत मनसेचा मोर्चा सुरू होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. या मोर्चात मनसेच्या अविनाश जाधवांसह ठाणेकर आणि रेल्वे प्रवासीसुद्धा सहभागी झाले आहेत. “दरदिवशी रेल्वे अपघातात वीस प्रवाशांचा मृत्यू होतो. यावर लवकरात लवकर उपाय काढण्यासाठी आणि योजना राबविण्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनाला ताकिद दिली. गेल्या 15 वर्षांत 51 प्रवाशांचा रेल्वे अपघाता मृत्यू झाला. त्याला कोण जबाबदार आहे”, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला. संभावित अपघात होण्याची शक्यता लेखी पत्राद्वारे तीन महिन्यांपूर्वीच वर्तवली असताना रेल्वे प्रशासनाने त्यावर काय कारवाई केली, याची लेखी माहिती सादर करण्याची मागणीही मनसेनं केली.
मनसेच्या प्रमुख मागण्या-
-
- मुंबई लोकलमधील प्रवाशांची संख्या आणि त्या प्रमाणात गाड्यांमधील आसन क्षमतेची उपलब्धी आहे का? याचा तक्ता सादर करा.
- दिवा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा चालू करण्यात येणाऱ्या अडचणींची लेखी माहिती द्या.
- रेल्वे अपघात नुकसान भरपाई रक्कम ही अत्यंत तुटपुंजी आहे. ती वाढवून 25 लाख रुपये करावी.
- उशिरा मिळालेला न्याय हा न्याय असूच शकत नाही. त्यामुळे अपघातांच्या केसेस अनेक वर्षे प्रलंबित ठेवण्याचं प्रयोजन काय?
- गेल्या 15 वर्षात 45 हजार प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील आठ हजार केसेस अद्यापही प्रलंबित आहेत. त्याची कारणे लेखी द्या.
- एका डब्यामध्ये किती प्रवाशांनी प्रवास करणं रेल्वे प्रशासनाला अपेक्षित आहे. याची नियमावली सादर करा.
- मुंबई लोकल सेवेतून मिळणारं मासिक उत्पन्न तथा मासिक खर्च याची माहिती द्या.
- स्वतंत्र मुंबई लोकल बोर्ड स्थापन करावा या मागणीबाबत रेल्वे प्रशासनाने काय निर्णय घेतला आहे याची लेखी माहिती द्या.
- राज ठाकरे यांच्या सुचनेप्रमाणे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवेश आणि निर्गमनसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने काय उपाय योजले आहेत त्याची माहिती द्या.
- एखाद्या लोकलला विलंब झाल्यास फलाटावर चेंगराचेंगरी सदृष्य परिस्थिती निर्माण होत असताना लोकल फलाटावर फुड स्टॉल, पेपर स्टॉल, जाहिराती स्क्रिन, जाहिरातींचे फलक उभारण्याची गरज काय? लोकांना फलाटावर रेंगाळत ठेवण्यामागचे प्रयोजन काय?
- रेल्वे स्थानकाच्या हद्दीतील फेरीवाले हटवून प्रवाशांचा प्रवेश तथा निर्गमन सुसह्य होईल याकडे रेल्वे प्रशासन कधी लक्ष देणार आहे?
- वातानुकूलीत गाड्यांचा वेग हा तुलनेने इतर गाड्यांपेक्षा कमी आहे. मग स्वतंत्र वातानुकूलीत गाडी चालवण्यापेक्षा प्रत्येक गाडीत काही डबे वातानुकूलीत ठेवायला हरकत काय?
“दररोज मुंबई रेल्वेचे अपघात घडत आहेत. रेल्वे चालते कशी हे एक जगाला आश्चर्य आहे. रेल्वेसाठी वेगळं महामंडळ करा हे सांगून काही होत नाही. रस्ते नाहीत, वाहतूक कोंडी होते. पुणे, मुंबई अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. आग लागली की बंबसुद्धा जाऊ शकणार नाही. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांनी रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. सर्वजण निवडणूक प्रचारामध्ये गुंतले आहेत. बंद दरवाजांचे लोकल आणणं शक्य आहे का”, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंब्रा लोकल अपघातानंतर केला होता.
