पालघर झेडपीत शिवसेना-भाजप बरोबरीत, काँग्रेस शून्यावर आऊट; खासदारपूत्रही पराभूत

| Updated on: Oct 06, 2021 | 2:14 PM

पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अत्यंत रंजक निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत. (palghar zilla parishad election, bjp, shiv sena in,congress out)

पालघर झेडपीत शिवसेना-भाजप बरोबरीत, काँग्रेस शून्यावर आऊट; खासदारपूत्रही पराभूत
shivsena
Follow us on

पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत अत्यंत रंजक निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला समसमान जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांचे चिरंजीव रोहित गावित यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

पालघर जिल्ह्यातील वाडा जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसच्या पदरी मात्र निराशा आली आहे. तर वाडा पंचायत समितीत शिवसेनेला एकच जागा मिळाली आहे. विक्रमगड जिल्हा परिषदेत भाजपला एक, मोखाडा जिल्हा परिषदेत शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी पुरस्कृत एक अपक्ष निवडून आला आहे. तर पालघर जिल्ह्यात काँग्रेसला खातंही खोलता आलेलं नाही.

एकूण 14 जागांचे निकाल हाती

पालघर जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा 14 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात शिवसेनेला सर्वाधिक 5, भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 4 आणि माकपला एका जागेवर विजय मिळाला आहे.

मनसे-भाजप युतीचा प्रयत्न फसला

दरम्यान, पालघरमध्ये मनसे आणि भाजपमध्ये युती झाली होती. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळेल असं वाटत होतं. मात्र या निवडणुकीत भाजप-मनसे युतीचा प्रयत्न फसला आहे. वाडा येथील सापणे पंचायत समितीत भाजप-मनसे युती होती. मात्र, या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला आहे.

खासदारपुत्राचा पराभव

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे. भाजप उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांना पराभवाची धूळ चारली. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती. डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट हे राज्याचे लक्ष वेधून घेत होता. वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून, आपला राजकीय वारसदार म्हणून स्वताचा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिगणात उतरविले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता यामुळं रोहित गावितांचा पराभव झाला. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली होती.

शिवसेनेचं यश समाधानकारक

पालघर जिल्हा परिषदमध्ये समाधान कारक निकाल लागला आहे. शिवसेनेने 5 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीने एकूण 11 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला मात्र चांगले यश मिळाले आहे, असं राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी खासदार गावित यांच्या चिरंजीवांच्या पराभवावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. गावित यांचा पराभव झाला आहे. परंतु, आता या जागेवर आम्ही पुन्हा जोमाने काम करू. शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. ते मान्य करावे लागेल. मात्र, ही जागा पुढीलवेळी जिंकण्यासाठी आम्ही पुन्हा प्रयत्न करू, असंही ते म्हणाले.

पालघर जिल्हा परिषदच्या 14 जागांचे निकाल जाहीर

शिवसेना – 5
भाजप – 4
राष्ट्रवादी – 4
माकपा – 1

वाडा जिल्हा परिषद

शिवसेना–2
राष्ट्रवादी –2
भाजपा–1

वाडा पंचायत समिती

शिवसेना–1

विक्रमगड जिल्हा परिषद

भाजपा—1

मोखाडा जिल्हा परिषद

शिवसेना–1
अपक्ष ( राष्ट्रवादी पुरस्कृत)–1

 

संबंधित बातम्या:

पोटनिवडणूक भाजपच्या तिकिटावर जिंकली, पुढच्याच निवडणुकीत हातावर बांधलं शिवबंधन; जाणून घ्या कोण आहेत राजेंद्र गावित?

स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?

Dhule ZP Election : धुळे जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता राखली, महाविकास आघाडीचा बार फुसका!

(palghar zilla parishad election, bjp, shiv sena in,congress out)