तर मुजोर रिक्षा चालकांचं परमिटही रद्द करू, प्रताप सरनाईक यांचा गंभीर इशारा

वाहतूक मंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी न बोलणाऱ्या रिक्षा चालकांना गंभीर इशारा दिला आहे. त्यांना मराठी शिकण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाईल, अन्यथा लायसन्स आणि नंतर परमिट रद्द करण्यात येईल. ७,७५० रिक्षाचालक मराठी परीक्षेत नापास झाले आहेत. प्रवाशांनीही चालकांशी मराठीत संवाद साधावा, असे आवाहन सरनाईक यांनी केले.

तर मुजोर रिक्षा चालकांचं परमिटही रद्द करू, प्रताप सरनाईक यांचा गंभीर इशारा
pratap sarnaik
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 17, 2026 | 1:26 PM

मराठी भाषा शिकण्यासाठी वेळ देऊनही न शिकणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यांना नोटीस देऊन 30 दिवसांची मुदत देऊन कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मुदत देऊनही मराठी बोलता आली नाही तर आधी लायसन्स आणि नंतर परमिट रद्द करण्याचा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्रात मराठी परीक्षेत 7,750 ऑटो-टॅक्सी चालक नापास झाले आहेत. या रिक्षाचालकांना वेळ वाढवून संधी देण्यासाठी सरकार विचार करणार असल्याचंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. आज ठाण्यात मीडियाशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी हा इशारा दिला आहे.

राज्यातील 1989 मधील नियमानुसार रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठीत संवाद साधा असं नमूद केलंय. मात्र गेल्या अनेक वर्षापासून अनेक रिक्षाचालकांना मराठी बोलताच येत नाही. व्यावहारिक ज्ञान मराठी असणं आवश्यक आहे. त्यावरून वादविवाद मोठ्या प्रमाणावर होत होते. म्हणूनआम्ही एक मोहीम आखली. रिक्षाचालकांना मराठी शिकवण्याचा ठरवलं. त्यासाठी रिक्षाचालकांच्या संघटनांनी तीन महिन्याची मुदत मागितली. आम्ही ही मुदत दिली. रिक्षाचालकांनी 16 ते 17 वाक्य शिकले तरी वाद होणार नाही. आमच्या या मोहिमेत साहित्यिकही आले. त्यांनीही रिक्षा चालकांचे वर्ग घेतले. जवळ जवळ 1 लाख 65 हजार रिक्षा, टॅक्सी चालकांनी आमच्याकडे नोंदणी केली होती. त्यात 1 लाख 40 हजार रिक्षाचालक उत्तीर्ण झाले. त्यांना प्रमाणापत्र देण्यात आले, असं प्रताप सरनाईक म्हणाले.

तर परमिटही रद्द करू

आम्ही मुजोर रिक्षा चालकांना कायाद्याच्या चौकटीत आणणार आहोत. एक मोहीम आखली जाणार आहे. जे मुजोर रिक्षा, टॅक्सी चालक मराठी शिकले नाहीत, त्यांच्या वर कारवाई करू. कारवाई करत असताना त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. या 30 दिवसात मराठी नाही शिकला तर तीन महिन्यांसाठी लायसन्स रद्द करण्यात येईल. त्यानंतरही मराठी नाही शिकला तर परमिटच रद्द करण्यात येईल, असा इशाराही प्रताप सरानाईक यांनी दिला आहे.

प्रवाशांनो मराठीत बोला

मराठी भाषा शिकण्यासाठी तुम्ही या. शिंदे साहेब म्हणाले की, क्लासेस सुरु ठेवायचे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही वर्ग सुरू ठेवणार आहोत. वर्गात भाग घ्यायचा नाही आणि आम्ही मराठी शिकणार नाही, असं म्हणणारे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तुम्ही पकडला गेला तर एक महिन्याची नोटीस दिली जाणार आहे, असं सांगतानाच प्रवाश्यांना सुद्धा आवाहन करतो की, रिक्षाचालकांशी मराठीत बोला. कारण चालक सांगतात प्रवाशी हिंदीत बोलतात. आम्ही मराठीत बोलायाला तयार असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, महाराष्ट्रात मराठी परीक्षेत 7,750 ऑटो-टॅक्सी चालक नापास झाले आहेत. राज्यातील ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकण्याची अंतिम मुदत संपली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us