7,750 रिक्षा, टॅक्सी चालक मराठी भाषेच्या परीक्षेत नापास, मुदत संपली, आता पुढे काय?
राज्यातील ऑटो आणि रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्यात आली आहे, 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना मराठी शिकण्यासाठी त्यांना मुदत देण्यात आली होती, आता ही मुदत संपली आहे. 7750 जण या परीक्षेत नापास झाले आहेत.

राज्यातील रिक्षा चालक तसेच टॅक्सी चालक यांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्यात आली आहे, त्यासाठी सरकारच्या वतीने खास प्रशिक्षण वर्गाची व्यवस्था करण्यात आली होती. या रिक्षा चालक तसेच टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत संपली आहे, आजपासून मराठी न येणाऱ्या चालकांवर आरटीओच्या वतीने करावाई करण्यात येणार आहे. मात्र एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे तब्बल 7,750 ऑटोचालक हे या मराठी भाषेच्या परीक्षेत नापास झाले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यभरात तब्बल 25,000 ऑटो चालक असे आहेत जे अजूनही सरकारच्या वतीनं दिलं जाणारं मराठी भाषा प्रमाणपत्र प्राप्त करू शकलेले नाहीत. यातील 7,750 चालक हे मराठी भाषेचा परीक्षेत नापास झाले आहेत. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा ही परीक्षा द्यावी लागणार आहे.
17, 427 चालक प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत
दरम्यान वाहतूक विभागाशी संबंधित एका अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलं की, 17, 427 चालक अजूनही प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांचं प्रशिक्षण अजून बाकी आहे, अशा चालकांची संख्या तुलनेनं मुंबईमध्ये जास्त आहे. मुंबईमध्ये अजून 9,196 चालक प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर ठाणे 4,871, नवी मुंबई 1,400, पालघर 350 आणि उर्वरीत महाराष्ट्रात 1,610 चालकांचं प्रशिक्षण बाकी आहे.
किती जण परीक्षा पास झाले?
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार ज्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी भाषा बोलता येत नाही, त्यांच्यासाठी सरकारच्या वतीने खास मराठी भाषा प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी 1.70 लाख लोकांनी अर्ज केला होता, त्यातील 1.40 लाखांहून अधिक लोकांनी ही मराठी भाषेची परीक्षा पास केली आहे, तर 7,750 चालक हे मराठी भाषेच्या परीक्षेमध्ये नापास झाले आहेत. आता मराठी भाषेची परीक्षा देण्यापूर्वी पुन्हा एकदा या चालकांना मराठी भाषेच धडे गिरवावे लागणार आहेत, त्यानंतर पुन्हा त्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणं सक्तीचं करण्यात आलं आहे.
