कपडे शिवता शिवताच गोळ्यांचा आवाज… मारेकऱ्यांच्या हातात चाकू… प्रत्यक्षदर्शीने सांगितला ठाण्यातला थरार
ठाण्यात ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले, गोळ्यांचा आवाज ऐकून बाहेर आले तेव्हा हल्लेखोरांच्या हातात चाकू होता. पूर्णेकर कुटुंबीयांनी माजी महापौरांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.

ठाण्यात काल रात्री ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या करण्यात आली. पूर्णेकर यांच्या कार्यालयासमोर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर पाच राऊंड गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नाही. मात्र, त्याहीपेक्षा प्रत्यक्षदर्शीने जे सांगितलं ते अत्यंत भयानक आहे. नेमकं काल रात्री काय घडलं? याचा आँखो देखा थरारच या प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे.
रेणू प्रजापती असं या प्रत्यक्षदर्शी महिलेचं नाव आहे. रेणू प्रजापती यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला होताना पाहिला आहे. गोळ्यांचा आवाज झाला तेव्हा कपडे शिवता शिवता मी घराच्या बाहेर आले. आरोपीच्या हातात चाकू होता. मी आणि माझ्या मुलीने तो पाहिला. त्यानंतर हे आरोपी दुचाकीवर बसून पळून गेले, असं या महिलेने सांगितलं. पण तिने या आरोपींना व्यवस्थित पाहिले नाही. ती घाबरली होती. त्यामुळे आरोपींना तिला पाहता आलं नाही. मात्र, हा प्रकार अत्यंत भयानक होता, असं त्यांनी सांगितलं.
माजी महापौरांच्या नवऱ्यावर आरोप
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांची काल रात्री मनोरमा नगर येथील कार्यालयाबाहेर दोन दुचाकीवरून चार जणांनी मिळून गोळीबार करत धारदार शस्त्राने हत्या केली. हल्लेखोर स्कुटी/दुचाकीवरून चेहऱ्याला रुमाल बांधून आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पूर्णेकर यांचे बंधू जयनाथ पूर्णेकर आणि मुलगा राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी हत्येचा कट रचल्याचा आणि धमक्या दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
9 पथके आरोपींच्या शोधात
कापूरबावडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. पप्या शिंदे आणि आकाश निमसे अशी या संशियतांची नावे आहेत. इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 9 पथके स्थापन करण्यात आली आहेत. स्कुटीवरून या आरोपींनी आधी रेकी केली. त्यानंतर बाजूलाच असणाऱ्या मैदानात गेले. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही आहेत. त्यानंतर पुन्हा पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या बाहेर दुचाकी उभी करून त्यांनी कट रचला आणि पूर्णेकर यांची हत्या केली. आरोपी पळून जात असतानाचे सीसीटी फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत.
पप्या शिंदेवर संशय
पप्या शिंदे हा हत्येच्या वेळेस कार्यालयामध्ये सोबत बसलेला होता. त्याच्यावर आरोपींनी कुठल्याच प्रकारचा हल्ला केला नाही. तसेच त्याला धमकावलेही नाही. त्यामुळे या हत्येमागे पप्या शिंदे असल्याचा आरोप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, पूर्णेकर हे मनोरमा नगरमधील बेघरांसाठी लढत होते. कलस्टर योजना आणि ड्रग्स रॅकेटच्या विरोधातही ते लढत होते.
