Pradeep Purnekar Case : ‘रात्री 10 नंतर बाहेर पडू नको, माझी गोळी तुला लागेल’ प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुलाकडून धक्कादायक गौप्यस्फोट
Pradeep Purnekar Case : "पप्या शिंदे आम्हाला सांगत होता की मी गोळी लागल्यानंतर त्यांना पकडले होते. पण पप्यावर एकही वार झाला नाही. त्यांना काहीच लागले नाही असे कसे होईल" असं राम पूर्णेकर म्हणाला.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी राजकीय हत्या झाली आहे. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका पूर्णेकर कुटुंबियांनी घेतली आहे. प्रदीप पूर्णेकर यांचा मृतदेह जे जे हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी आणला आहे. “मृतदेह आल्यानंतर देखील आम्ही तो ताब्यात घेणार नाही, कापूरबावडी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जाऊन बसणार, जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही” असं त्यांचा मुलगा राम पूर्णेकर म्हणाला. “मला राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्यावर संशय आहे, कारण काही दिवसांपूर्वी नीलकंठ येथे राजेंद्र शिंदे आणि काल ज्या आरोपींची नावे आलेली आहेत ते आरोपी एकत्र उभे होते आणि मला बघून ते दचकले, त्यांना मी स्वतः पाहिले आहे. त्यानंतर एक व्यक्ती मला येऊन विचारून गेला की तू प्रदीप पुर्णेकर यांचा मुलगा आहेस का” असं राम पूर्णेकरने सांगितलं.
यावरून मला संशय होता म्हणून मी माझ्या वडिलांना आधीच सांगितले होते. “काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. राजेंद्र शिंदे यांचे देखील नाव सांगितले होते. तेव्हा वडिलांनी मला रात्री 10 नंतर बाहेर पडू नको असे सांगितले. माझी गोळी तुला लागेल असे देखील सांगितले. त्यामुळे त्यांना देखील आधीपासून हा संशय होता असे वाटते” असं राम पूर्णेकर म्हणाला.
हल्ला झाला तेव्हा ऑफिसमध्ये बसून होता
“मीनाक्षी शिंदे यांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती, त्यामध्ये त्यांनी माझ्या वडिलांचे नाव घेतले होते. निवडणुका झाल्यानंतर मी बाळाला संपवेन अशी धमकी त्यांनी दिली होती. त्यामुळे मला त्यांच्यावर संशय आहे. पप्या शिंदे ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तो हल्ला झाला तेव्हा ऑफिसमध्ये बसून होता, दोन दिवसापूर्वी देखील तो ऑफिसमध्ये आला होता आणि माझ्या वडिलांशी एक दीड तास गप्पा मारत होता, पण तेव्हा ऑफिसमध्ये अनेक लोक होती. काल ऑफिसमध्ये कोणी नव्हते” असं राम पूर्णेकर म्हणाले.
पप्यावर एकही वार झाला नाही
“पप्या शिंदे आम्हाला सांगत होता की मी गोळी लागल्यानंतर त्यांना पकडले होते. पण पप्यावर एकही वार झाला नाही. त्यांना काहीच लागले नाही असे कसे होईल, पप्या शिंदे हा हॉस्पिटलमध्ये देखील आला होता आणि कनोजिया याला शिव्या देत होता, पण नंतर पोलिसांनी त्यालाच संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे तो माझ्या वडिलांचा जुना मित्र होता” असं राम पूर्णेकर म्हणाले.
माझ्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे
“माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे की माझ्या वडिलांना न्याय मिळायला पाहिजे. त्यांनी आयुष्यभर न्यायासाठी काम केले आहे, उद्धव ठाकरे यांच्या बद्दल मला सध्या काही माहिती नाही. मी रात्रभर इथेच आहे त्यांचा फोन येऊन गेला असेल कदाचित” असं मुलगा राम म्हणाला.
