‘काही घुसखोर मंडळींनी..परंतू, लातूर पॅटर्न…,’ नीट प्रकरणात अमित देशमुख यांचे वक्तव्य
नीट पेपर फुटी प्रकरणात देशभरातून सीबीआयने ११ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात लातूर येथील एका निवृत्त प्राध्यापकाला देखील अटक झाली आहे.या प्रकरणात काँग्रसचे नेते अमित देशमुख यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.

‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटीने देशभरात गदारोळ माजला आहे. या प्रकरणातील २२ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापकांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत,ही अत्यंत गंभीर , दु्र्दैवी आणि धक्कादायक बाब आहे अशा शब्दात काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी प्रथमच आपली भूमिका मांडली आहे.
काँग्रेस नेते अमित देशमुख यांची पोस्ट जशीच्या तशी…
‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही परीक्षा संबंधित यंत्रणेने रद्दही केली आहे. लवकरच नीटची पुनर्परीक्षा होणार आहे. या पेपरफुटीचा तपास सीबीआय आणि इतर तत्सम यंत्रणांमार्फत सध्या सुरू आहे. राज्यात आणि देशभरात या प्रकरणी अनेक जणांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत, ही अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि तेवढीच धक्कादायक बाब आहे. एकूणच हे पेपरफुटीचे प्रकरण, गुणवंत आणि कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खिलवाड करणारे असल्यामुळे ते निषेधार्हच आहे.
या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सरकार सध्या ज्या गतीने कारवाई करते आहे त्याचे मी स्वागत करतो आहे. या तपासात अटक झालेल्या मंडळींकडून नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातून आणखीनही चौकशी आणि तपास सुरूच आहे. तपास यंत्रणेने सखोल चौकशी करून या प्रकरणाची पाळीमुळे उखडून काढावीत अशीच माझ्यासह प्रत्येकाची अपेक्षा आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही गेलेले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपपत्र दाखल होईल, मा. न्यायालय पुराव्याच्या आधारे कोण दोषी आहेत ते ठरवेल, दोषी ठरणाऱ्यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा नक्कीच होईल, ज्यामुळे पुन्हा असा गुन्हा करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही ही अपेक्षा आहे.
तपास यंत्रणा योग्य पद्धतीने त्यांचे काम करीत असताना आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झालेले असताना आपण काही टिप्पणी करणे योग्य राहील का…..? असा प्रश्न माझ्यासमोर होता, मात्र दरम्यानच्या काळात काही उलट सुलट चर्चा झाल्या, काही मंडळींनी अनावश्यक वक्तव्य केली, त्यानंतर या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी यावर बोलण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने मी इथे माझे मत मांडत आहे.
मागच्या काही वर्षात एकूणच देशभरातील शैक्षणिक, नोकरभरती आणि स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता हरवून गेलेली आहे. अनेक परीक्षेतील पेपरफुटीमुळे त्या परीक्षांचा बोजवारा उडालेला आहे. परिणामी अशा परीक्षा घेणाऱ्या व्यवस्थांमधील ढिसाळपणाबद्दल समाजातून दबक्या आवाजात तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
सामाजिक प्रश्नांची बांधिलकी जपणाऱ्या काँग्रेस पक्षानेच देशभरातील पेपरफुटीचा मुददा उचलून धरून सरकारला या संदर्भात जाब विचारला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात एकूण ७० परीक्षांमध्ये पेपरफुटी घडल्याचे सरकारच्या निदर्शनास आणून देऊन या यंत्रणांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची मागणी केलेली आहे. केवळ मागणी करून न थांबता काँग्रेस पक्षाने संसदेतील या चर्चेच्या संदर्भातील लढाई रस्त्यावर येऊनही लढली आहे.
एवढे सर्व होऊनही पुन्हा एकदा देशातील २२-२३ लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटला आहे. त्यामुळे संपूर्ण परीक्षा रद्द करण्याची नामुस्की संबंधित यंत्रणा आणि सरकारवर आली आहे. या नामुश्कीनंतर देशव्यापी नीट पेपरफुटी प्रकरणी कारवाई करणे सरकारला अनिवार्य ठरले होते, त्यामुळेच सरकारकडून या संदर्भाने ठोस पावले उचलली जात आहेत. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही सर्वांचीच भावना आहे.
या प्रकरणी प्रारंभी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या( NTA) नीट पेपर सेट करण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेले लातूर येथील एक निवृत्त प्राध्यापक आणि त्यानंतर एका शिकवणी क्लासचे मालक, आणि आपल्या पाल्यासाठी पेपर विकत घेणाऱ्यांनांही अटक झाली आहे. दुर्दैवाने त्या अटकेला अनेक जुने संदर्भ जोडण्याचे प्रयत्न काही मंडळींनी केले आहेत. त्यामुळे मी येथे स्पष्ट करू इच्छितो की, जे संदर्भ सामाजिक माध्यमांनी दिले आहेत ते सर्व तथ्यहीन आहेत. भूतकाळात एखाद्याने केलेल्या वक्तव्याचे वर्तमानकाळात संदर्भ जोडणे अजिबात शहाणपणाचे ठरत नाही. ज्यांनी संदर्भ जोडण्याचे प्रयत्न केले आहेत त्यांचा हेतू शुद्ध दिसत नाही.
तपास यंत्रणांचे काम गतीने सुरू असताना आणि हे प्रकरण न्याय प्रविष्ट झालेले असताना, मी या संदर्भात टिप्पणी करावी असे मला अजिबात वाटत नव्हते; परंतु ज्या पक्षाचे राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, या सरकारच्या काळातच पेपरफुटीचे असंख्य प्रकार घडत आहेत, लाखो विद्यार्थ्यांचे, सुशिक्षीत तरुणांचे भविष्य अंधकारमय बनले आहे. अशा परिस्थितीत कोणत्या विषयावर बोलावे आणि न बोलावे याची परिपक्वता नसलेले
सत्ताधारी पक्षाचेच उथळ पुढारी अशा संवेदनशील प्रसंगात राजकीय पोळी भाजण्यासाठी संदर्भहीन वक्तव्य करू लागले आहेत. खरे तर त्यांचीच वक्तव्ये आता संशयास्पद वाटावीत अशी माहिती पुढे येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत सरकारी व्यवस्थेला त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू देणे आवश्यक आहे. योग्य पद्धतीने तपास झाला तर सर्व तथ्ये बाहेर येणार आहेत, त्यावर पुढे न्यायव्यवस्था आहे, तेथे दोषी मंडळींना नक्की शिक्षा होणार आहे; तोपर्यंत धीर धरण्याचा शहाणपणा सर्वांनीच बाळगायला हवा.
शैक्षणिक क्षेत्रातील लातूर पॅटर्नला आजवर अनेकांनी हरवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना ते शक्य झालेले नाही. प्रत्येक वेळी ‘ लातूर पॅटर्न’ अभेद्य आणि अजिंक्य राहिला आहे, भविष्यातही अजिंक्यच राहील याची मला खात्री आहे. लातूर येथील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, पालक आणि संस्थाचालकांच्या अथक व सातत्यपूर्ण परिश्रमातून या पॅटर्नची निर्मिती झालेली आहे. एखाद्याने गुन्हा केला म्हणून संपूर्ण समाज गुन्हेगार ठरत नसतो. त्या न्यायाने काही घुसखोर मंडळींनी गैरकृत्ये केली असतील तर त्यामुळे लातूरच्या एकूण शैक्षणिक लौकिकाला अजिबात धक्का बसणार नाही अशी माझी धारणा आहे. ज्याने गुन्हा केला असेल त्या गुन्हेगाराला योग्य ती शिक्षा नक्कीच मिळेल अशी अपेक्षा आहे.
लातूरच्या शैक्षणिक वातावरणावर जे सध्या सावट आले आहे ते लवकरच दूर होईल आणि बावन्नकशी सोन्याप्रमाणे “लातूर पॅटर्न” पुन्हा झळाळून निघेल, याचा मला विश्वास आहे. लातूरचा शैक्षणिक लौकिक कायम राखण्यासाठी, लातूर पॅटर्नच्या उजळ माथ्याची चकाकी आणखीन वाढावी यासाठी माझ्यासह सर्वांनी प्रयत्न करायला हवे आहेत, यासाठी लातूरचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांच्या सोबतीने मी आवश्यक ते योगदान दिले आहे आणि पुढेही देत राहणार आहे, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच मंडळींनी, त्याचबरोबर पालक व विद्यार्थी या सर्वांनी मिळून त्याच जिद्दीने लातूरच्या शैक्षणिक यशाचे सातत्य कायम राखण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत एवढेच माझे सांगणे आहे.
– अमित विलासराव देशमुख