Manoj Jarange Patil : अंतरवली सोडण्यापूर्वी मनोज जरांगेंची समस्त मराठ्यांना एकच कळकळची विनंती की…

Manoj Jarange Patil : "आत्महत्या करु नका. शांततेच आंदोलन कुणीच रोखू शकत नाही. कोणी शांतता सोडायची नाही. आर-पारची शेवटची लढाई आहे. निर्णायक टप्प्यावर आंदोलन आहे. कोणी जाळपोळ, दगडफेक करु नका" असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

Manoj Jarange Patil : अंतरवली सोडण्यापूर्वी मनोज जरांगेंची समस्त मराठ्यांना एकच कळकळची विनंती की...
Manoj Jarange Patil
| Updated on: Aug 27, 2025 | 9:45 AM

“डोक्याने लढाई जिंकायची आहे. हिंदुंशी ज्यांचे घेणे-देणे नाही, ते अडवत आहेत. आज हिंदुत्वाचा वापर केला जात आहे. हा प्रश्न मोदी आणि अमित शाहना आहे. आम्ही शांततेत येत आहोत, सणात अडचणी येऊ देणार नाही. आता देव-देवतांना पुढे करत आहेत, आता सांगून चार महिने झाले आहेत. देवांना पुढे करुन गोर गरिबांवर अन्याय केला जात आहे. नवीन कायदा काढण्यात आला, 2025 कायदा आहे आणि तुम्ही परवानगी घेतली नाही असे आम्हाला सांगतात. दहशतवाद्यांसारखे डाव टाकले जात आहेत. न्यायालय आम्हाला न्याय देणार आहे. नवीन कायदा काढला त्याचे ऑफिस सापडत नाही” अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवली सराटीमधून मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत. त्या आधी त्यांनी उपस्थित मराठा बांधवांना संबोधित केलं.

“परवानगी द्यायची की नाही, सरकार ठरवणार, म्हणजे या मागे देवेंद्र फडणवीस आहे. देवेंद्र फडणवीस देवाच्या मागे लपत आहेत. गणपती बाप्पा आणि छत्रपती शिवराय यांचे आपल्याला आशीर्वाद आहेत. परवानगी येत असती जात असती. 58 लाख पुरावे असून कायदा करत नाहीत, म्हणून लातूर मध्ये आत्महत्या झाली. मराठ्यांचा संयम ढळू देऊ नका, मी गोळ्या घालून घ्यायला तयार आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “एकाही मराठ्यांनी दगडफेक आणि जाळपोळ करायची नाही. जर मुंबईत त्रास झाला तर जातीचे रक्षण करा. तुमच्यासाठी जीव केला तरी मागे हटणार नाही. सावध होऊन ही लढाई विजयाकडे न्यायाची आहे” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

‘जातीची सेवा करण्याची संधी आली’

“गावातील मराठ्यांनी मुंबईला गेलेल्या मराठ्यांकडे लक्ष ठेवा. आजी माजी आमदार, खासदार, नेते यांना जातीची सेवा करण्याची संधी आली आहे, नाही तर मराठा समाज समाज आयुष्यभर माफ करणार नाही. गरीब मराठ्यांचा आधार श्रीमंत मराठे आहेत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “अटीतटीचा सामना आहे. समाजावर संकट घोंगावत आहेत, काना डोळा करू नका. साथ दिली तर समाज तुम्हाला कधीही विसरणार नाही” असं मनोज जरांगे म्हणाले. ‘गाड्या व्यवस्थित चालावा, शक्यतो मोटार सायकल वाल्यानी येऊ नये’ असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.

‘मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका’

“मराठ्यांच्या पोरांना माझी हातजोडून विनंती आहे, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्महत्या करु नका. तुम्ही आत्महत्या केली, काय अर्थ आहे त्या आरक्षणाला. एकाने सुद्धा आत्महत्या करु नका. आपण डाव टाकून रस्ता सर करणार आहोत. मुंबईकडे कूच करणार आहोत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे यांनी हात जोडून काय विनंती केली?

“मायबाप मराठ्यानो शेतकरी मराठे, नोकरदार, मजूर तुमच्या लेकरा बाळासाठी चाललो आहे. जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीच रक्षण करा. हा शब्द खाली पडू देऊ नका. सगळ्या मराठ्यांना हात जोडून विनंती आहे, की तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान गेलं, तरी मी मागे हटणार नाही. इतका पक्का निर्धार मी केला आहे” असं मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटीतून निघण्यापूर्वी म्हणाले.