EXCLUSIVE : पंकजा मुंडेंच्या कारखान्यामुळे हजारो एकर शेती उद्ध्वस्त

बीड : परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे अनेक गावांचे जगणेच मुश्किल झाले आहे. दूषित पाण्याचा परिणाम नागरिक आणि गुरांवरच नाही, तर तब्बल हजारो एक्कर शेतीवर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे. परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी कारखाना आहे. परिसरातील बेरोजगारांच्या …

EXCLUSIVE : पंकजा मुंडेंच्या कारखान्यामुळे हजारो एकर शेती उद्ध्वस्त

बीड : परळीच्या पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. कारखान्याच्या वेस्टेज पाण्यामुळे अनेक गावांचे जगणेच मुश्किल झाले आहे. दूषित पाण्याचा परिणाम नागरिक आणि गुरांवरच नाही, तर तब्बल हजारो एक्कर शेतीवर झाला आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा हा कारखाना आहे.

परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी कारखाना आहे. परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे संसार सुरुळीत चालावे म्हणून दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. मात्र सध्या हा कारखाना इथल्या नागरिकांच्या मुळावर उठला आहे. इथल्या ढिसाळ नियोजनामुळे परिसरातील हजारो एक्कर शेती बाधित झाली आहे. कारखान्याच्या बाजूलाच दुषित पाण्याचा निचरा केला जातो. मात्र नियोजन व्यवस्थित नसल्याने हे दूषित पाणी हातपंप, बोरवेल आणि विहिरीत मिसळले आहे. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विष्कळीत झाले आहे.

साहेबराव चव्हाण यांची या परिसरात 30 एकर शेती आहे. परंतु, कारखान्याचे दूषित पाणी यांच्या विहिरीत उतरल्याने त्यांचे संपूर्ण पीक बाधित झाले आहे. त्यांचे ऊसाचे हे पीक जळाले आहे. या विहिरीकडे जरा नीट पहा, पाण्यावर दूषित पाण्याचे हे तरंग आहेत. पाणी लाल झाले आहे. याप्रकरणी अनेक वेळा कारखाना प्रशासनाकडे याची तक्रार करण्यात आली. मात्र कोणीही याकडे लक्ष दिले नाही. एवढेच नाही पंकजा मुंडे यांनीदेखील या प्रश्नाला बगल दिल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

कारखान्याचे दूषित पाणी खरच शेतकऱ्यांच्या विहिरीत जाते काय, हे जाणून घेण्यासाठी टीव्ही 9 मराठीने याची शहानिशा केली. तेव्हा धक्कादायक प्रकार नजरेसमोर आला. भल्या मोठ्या तलावाच्या स्वरुपात दिसत असलेले हे दृश्य पाहून तुम्हाला पाणी आहे की असे वाटेल, मात्र हे पाणी नाही.

वरील फोटोत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे वेस्टेज पाण्याचे दृश्य आहे. निव्वळ उघड्यावर हे पाणी साचविण्यात आले आहे. याच बाजूला एक मोठी नदी आहे. आणि याच नदीच्या मार्गाने हे पाणी परिसरातील बोरवेल, विहिरीत जाते.

गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या उद्भवत आहे. मात्र पंकजा मुंडेंना आव्हान देण्याची कुणाचीच हिंमत नसल्याने परिसरातील शेकडो शेतकरी हतबल झाले आहेत. चरण्यासाठी गुरे शेतात सोडली जातात. मात्र तहान लागल्यानंतर एखादा जनावर नजर चुकवून पाणी पितो आणि तेच त्या जनावराच्या जीवावर बेतते. दुषित पाणी पिल्याने साहेबराव यांचे आतापर्यंत चार गुरांचा गर्भपात झाला आहे.

साहेबराव यांचा ऊसच नाही तर त्यांच्या शेतातील फळ भाज्यांचीदेखील मोठी हानी झाली आहे. केमिकलयुक्त पाणी असल्याने सर्व भाज्या अक्षरश: जळून गेल्या आहेत. त्यांच्या शेतातील एकही भाजी माणसांना खाण्यायोग्य नाही. गेली अनेक वर्षांपासून इथले नागरिक निमुटपणे हे सहन करीत आहे. दूषित पाण्यामुळे होणारे हाल पाहून अनेक वेळा तक्रारी दिल्या कारवाई मात्र काहीच झाली नाही. आता तरी आम्हाला मदत करावी आणि या दुषित पाण्याचे योग्य विल्हेवाट लावावी, अशी आर्त हाक इथले शेतकरी करत आहेत.

सतत दुष्काळी जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. अशात कारखान्याच्या पाण्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. दुषित पाण्यामुळे साहेबराव यांचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहेच तर दुसरीकडे शेतीचा पोत देखील खराब झालाय यामुळे हा शेतकरी दुहिरी संकटात सापडला आहे. शेतक-यांची ही केवीलवाणी अवस्था पाहून तुमचे काळीज चर्र झाले असेल, परंतु एरवी विकासकामाची गंगा वाहून नेण्याची भाषा करणा-या राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना त्यांच्याच मतदारसंघातील शेतकऱ्यांचा ही दयनीय अवस्था का दिसत नाही, हा खरा प्रश्न आहे.

नामदेव आघाव, व्हा. चेअरमन, वैद्यनाथ कारखाना यांची प्रतिक्रिया जशीच्या तशी

“गेल्या वर्षी असं झालं की पाणी जास्त होतं….आपण गेल्यावर्षी …… थोडं पाणी आपलं वेस्टेज जात होतं. यावर्षी आपण पाणी फिल्टर करुन, पाणी मधल्या मध्ये फिल्टर करुन जिरवायचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही आपण पाणी दोन दिवस तीन दिवस वापरुन ते पाणी आपण तिथं जिरवतं होतो, तसं यावर्षीही आपण पाणी हे वेस्टेज जे पाणी आहे ते तिथे जिरवणार आहोत. कारखान्यातील वेस्टेज पाणी जनावरांना पिण्यासाठी आम्ही सोडतच नाही. यावर्षी आणखीन कारखाना चालू नसल्यामुळे, आपण पाणी सोडलेलंही नाही आणि नळालाही पाणी नाही. पण आता आपण गाळप चालू करु, त्यावेळेस पाणी फिल्टर करुन वापरु, जे पाणी निघेल ते तिथेच जिरवू. यापूर्वीही जिरवलेलाच आहे. फक्त गेल्या वेळेस हा प्रश्न थोडा झालता, ते आम्ही यावर्षी कव्हर केला आहे” 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *