
मुंबईत मंगळवारी समुद्राला मोठी भरती आली. चार ते पाच मीटर उंच लाटा उसळल्याने समुद्राचे रौद्रस्वरूप पाहायला मिळाले. लाटा पाहण्यासाठी मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्यांवर मोठी गर्दी केली. मरीन ड्राईव्ह, जुहू, गेटवे परिसरात मुंबई पालिकेचा बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आज पावसाने थोडी उघडीप दिली आहे. परंतु विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या मुसळधार पावसाचा महालक्ष्मी रेसकोर्सलाही फटका बसला होता. महालक्ष्मी रेसकोर्सला तळ्याचे स्वरूप आले. संपूर्ण मैदानात पाणी साचले. घोड्यांची शर्यत होणारा ट्रॅकही पाण्याखाली गेला आहे.
चिपळूणमध्ये पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होत असते. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. ऑगस्टपर्यंत चिपळूणमध्ये एनडीआरएफचे जवान राहणार आहे. चिपळूणमधील शासकीय निवासस्थान परिसरात एनडीआरएफची टीम तैनात राहणार आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदी पात्रामध्ये वाढ झाली होती. काल सांगलीच्या कृष्णा नदीची पातळी ही 16 फुटांवर पोचली होती. मात्र आज कृष्णाची पातळी ही जवळपास 15 फुटांपर्यंत आली आहे. एक फुटांनी कृष्णेची पातळी उतरली आहे. त्यामुळे सांगलीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र कृष्णा आणि वारणा नदीपात्रावरील चार बंधारे अद्यापही पाण्याखालीच आहेत. तर जिल्ह्यातील शेतीमध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचे चित्रही पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे.
राज्यात तळकोकणात ३५ वर्षांनंतर वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने पुण्यात सुद्धा नवीन विक्रम केला आहे. पुण्यात मान्सून यापूर्वी १९६२ मध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर यंदाच मान्सून २६ मे रोजी पुण्यात दाखल झाला. राज्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल आहे. पुढील ४ ते ५ दिवसांत राज्याच्या अन्य भागातही मान्सून पोहचणार आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली होती.